
श्रीविद्यामहायोगाविषयी थोडक्यात
श्रीविद्याअखंडमहायोग या अध्यात्मिक साधन पद्धतीचे प्रणयन देवता ,सिद्ध व मानव यांच्यामध्ये करण्याचा प्रारंभ या विद्यमान वैवस्वत मन्वंतरामध्ये आदिविश्वमहागुरू भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्ती यांनी केला. श्रीविद्याअखंडमहायोगाचे आद्य आचार्य भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्ती हे होत. सच्चिदानंदस्वरूप परमार्थतत्वाचा सर्वोच्च ,परिपूर्ण साक्षात्कार प्राप्त व्हावा अशा तीव्र अभिप्सेने युक्त असलेल्याजिज्ञासू साधकांसाठी भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्तिंनी श्रीविद्याअखंडमहायोग ही साधनापद्धती सर्वप्रथम प्रचारात आणली. श्रीविद्याअखंडमहायोग हा विशेष योगप्रकार श्रीविद्यामहायोग,श्री ब्रह्मविद्यामहायोग आणि महायोग अशा इतरही नावांनी पारमार्थिक साधकांच्या समुहात ओळखला जातो.
श्रीविद्या म्हणजे चित्शक्ती होय .परब्रम्ह ,परमात्मा, भगवत्स्वरूप सच्चिदानंदाची दिव्य चेतन शक्ती म्हणजेच श्रीविद्या होय. ज्याप्रमाणे ज्वलनशक्ती ही अग्नीची स्वाभाविक शक्ती आहे, अंधारनिवारक प्रकाशशक्ती ही जशी सूर्याची स्वाभाविक शक्ती आहे, त्याप्रमाणे श्रीविद्या ही सच्चिदानंद परब्रम्हाची अंगभूत स्वाभाविक शक्ती होय. म्हणून श्रीविद्येला ब्रह्मविद्या असेही म्हणतात. परमार्थतत्वाच्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान अशा त्रिविध रूपांना प्रकाशित करणारी श्रीविद्यासुद्धा त्रिविध स्वरुपाची समीष्टीरूपिनी प्रज्ञा म्हणजेच श्रीविद्या होय. ही दिव्यप्रज्ञारूपिनी श्रीविद्या जेव्हा साधकाच्या अंत:करणात प्रवेश करते तेव्हा तिच्या प्रकाशात साधक परमार्थतत्वाच्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान अशा त्रिविध स्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त करून घेतो.
निर्गुणनिराकारपरब्रह्मासी मी नित्य अभिन्न एकरूपच आहे, हे प्रज्ञान म्हणजे पराविद्या होय. सगुणनिराकार अनंतशक्तीसंपन्न परमात्म्याचा मी अंश असून त्या परमेश्वराशी माझे सादृश्य अथवा साध्यर्म आहे, अशा आकाराने स्फुरणारे साक्षात्कारी प्रज्ञान म्हणजेच परापराविद्या होय. तर निष्काम प्रेमी स्वरूप सगुण साकार,दिव्यव्यक्तीसंपन्न भगवंताशी अथवा भगवतीशी माझे स्वाभाविक अखंड सामीप्य आहे, असे साधकाच्या अंत:करणामध्ये स्फुरणारे साक्षात्कारी प्रज्ञान म्हणजेच अपराविद्या होय. या त्रिविध दिव्य विद्याची समष्टी म्हणजेच श्रीविद्या होय. तीच शुद्धविद्या आहे. या दिव्य श्रीविद्येचा प्रकाश साधकाच्या अंतःकरणामध्ये घडवून आणून तिच्या प्रकाशामध्ये साधकाला त्याचे परब्रम्हतत्वाशी असलेले अभेद संबंधनात्मक सायुज्य, त्याचे परमात्मतत्वाशी असलेले भेदाभेदात्म्क संबंधातील सादृश्य आणि भगवत्तत्वाबरोबर असलेले भेद संबंधातील सामीप्य त्या साधकाच्या अनुभवकक्षेमध्ये आणणे हे श्रीविद्यामहायोग साधनेचे प्रयोजन आहे.
तर सर्वच साधना पद्धतीप्रमाणे श्रीविद्याअखंडमहायोग साधना पद्धतीची बीजेसुद्धा प्राचीन वेदांमध्ये आहेत. अर्थात श्रीविद्यामहायोग साधना ही परिपूर्ण वेदमूलकआहे. श्रीविद्यामहायोग साधन परंपरा वेदमूलकसनातन धर्म परंपरेचा एक भव्य, व्यापक अविष्कार आहे. अनादि अशा श्रुती अथवा वेदांपासून उगम पावलेली श्रीविद्यामहायोग परंपरा कालौघामधून विविध स्मृती,पुराणे तंत्रादि आगम ग्रंथ अशा विविध ऋषी व देवताप्रणित साहित्यामधून विकसीत होत गेली. या साधनापद्धतीने अध्यात्मीक जीवन व साधना यांच्यासंबंधी एक सर्वसमावेशक अशा व्यापक दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला आहे. श्रीविद्यामहायोग परंपरेचा हा व्यापक दृष्टीकोन तिच्या परमार्थतत्वाविषयीच्या सिद्धांतामधून दिसून येतो. सच्चिदानंद तत्व हे केवळ निर्गुणच आहे अथवा निराकारच आहे; ते केवळ विश्वरुपच अथवा विश्वातीत आहे असा परमार्थतत्वासंबंधीचा एकांगी दृष्टीकोन श्रीविद्यामहायोग परंपरेने स्वीकारलेला नाही. या परंपरेचा परमार्थतत्वाविषयी असा सिद्धांत आहे की, परमार्थ तत्व हे जसे निर्गुण निराकार आहे तसेच ते सगुण साकारही आहे. ते जसे विश्वरूप आहे तसेच ते विश्वातीत आहे. ते परमार्थतत्व समस्त जीवप्रकृरतीत अनुस्यूत असलेल्या मर्यादांच्या पलिकडे असलेले व्यक्तीत्वहीन परब्रह्म आहेच परंतु तेच परमार्थतत्व दिव्य व्यक्तीत्व धारण करून भगवान किवा भगवती या स्वरुपात पृथ्वीवर अवतीर्णही होते आणि दिव्य अथवा देवमानवाचा आदर्श सर्व जगासमोर प्रस्तुत ही करते.
निर्गुणनिराकारपरब्रह्म,सगुणनिराकारपरमात्मा आणि सगुणसाकारभगवान ही तिनही रूपे त्या एका अखंड परमार्थतत्वाचीच त्रीविध अंगे होत. यातील कोणतेही एक अंग अधिक सत्य किंवा अधिक श्रेयस्कर आहे असे नसून परमार्थतत्वाची ही तिनही अंगे परिपूर्ण सत्य व सारख्याच प्रमाणात श्रेयस्कर आहेत. यापैकी कोणत्याही एकाच अंगाचा साक्षात्कार करून घेण्यात व त्या साक्षात्कारापर्यंतच थांबण्यात पारमार्थिक प्रज्ञानाची पूर्णता गाठली जात नाही. केवळ निर्गुणनिराकारपरब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्यातच धन्यता मानणे अथवा परमार्थतत्वाचा सगुण साकार अविष्कार असलेल्या भगवत्विग्रह स्वरूप देवीदेवतांच्या साक्षात्कारामध्येच मन रमून राहणे ही पारमार्थिक प्रज्ञानाची अपूर्णता होय, असा श्रीविद्यामहायोग परंपरेचा दृष्टीकोन आहे. श्रीविद्यामहायोगाच्या साधकाने सगुणसाकार भगवंताचा साक्षात्कार करून घ्यावा; सगुणनिराकार परमात्मतत्वाचासुद्धा साक्षात्कार करून घ्यावा; त्याचबरोबर निर्गुणनिराकारपरब्रह्मचा साक्षात्कार प्राप्त करून घ्यावा.
निष्कर्ष असा की, निर्गुणनिराकारस्वरूप परब्रह्म, सगुण निराकार स्वरूप परमात्मा आणि सगुणसाकार स्वरूप भगवान या परमार्थतत्वाच्या तिनही स्वरूपांची अनुभूती प्राप्त करून घेणे यामध्येच पारमार्थिक साक्षात्काराची परिपूर्णता आहे असा श्रीविद्यामहायोग परंपरेतील आचार्यांचा दृष्टीकोन आहे. श्रीविद्यामहायोग साधनेमध्ये प्रवेश करू इच्छिना-या जिज्ञासू साधकाने आपले मन सर्व प्रकारच्या पूर्वग्रहापासून मुक्त ठेवले पाहिजे की जेणेकरून त्याला सच्चिदानंद परमार्थतत्वाच्या या तिनही स्वरूपाचा सारख्याच तन्मयतेने, समरसतेने आस्वाद घेता आला पाहिजे. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या परमार्थतत्वाच्या प्रत्येक स्वरूपाचा सारख्याच समरसतेने आस्वाद घेताना त्यातील कोणत्यातरी एकाच स्वरूपाच्या परमार्थतत्वाच्या प्राप्त असलेल्या पारमार्थिक अनुभूतीचा पूर्ण समरसतेने आस्वाद घेण्याबरोबरच परमार्थतत्वाच्या पूर्वी अनुभवात न आलेल्या अशा नूतन स्वरूपाचा अनुभव घेण्याविषयीसुद्धा मन तितकेच उत्सुक,जिज्ञासू असणेइतपत महायोग साधकांचे मन सर्वप्रकारच्या पूर्वग्रह, पूर्वसंस्कार यांच्या प्रभावातून मुक्त असले पाहिजे. असे मुक्त झालेले मनच निर्गुणनिराकार ब्रह्मतत्वाशी असलेला अभेदात्मक संबंध जितक्या उत्कट आनंदाने अनुभवते तितक्याच उत्कट आनंदाने ते मन सगुणनिराकार परमात्म्याबरोबर असलेले आपले दिव्य सादृश्य अनुभवू शकते आणि तितक्याच उत्कट आनंदाने सगुणसाकारस्वरूप निष्कामप्रेमी असलेल्या भगवंताच्या मधुर सानिध्याचेसुद्धा आस्वाद घेवू शकते.
आपण प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे श्रीविद्याअखंडमाहायोग साधनक्रमाचे आद्यप्रणेते भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्ती हे होत. भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्तिंनीश्रीविद्यामाहायोगाचा उपदेश महासती अनसूया आणि महर्षि अत्री यांचे पुत्र आणि ब्रम्हा, विष्णूव महेश यांचा अवतार असलेले भगवान श्रीदत्तात्रेय यांना केला. भगवान श्री दत्तात्रेयांनी परमशिवापासून त्यांना मिळालेल्या या विद्येचा उपदेश त्यांचे शिष्यअसलेल्या रेणुकानंदन जमदग्नीपुत्र भार्गव परशुरामांना केला. भार्गव परशुराम भगवान महाविष्णुच्या दहा प्रमुख अवतारापैकी सहावे अवतार होत. भगवान भार्गव परशुरामांनी या महायोगाचा उपदेश त्यांचे शिष्योत्तम श्रीमन् महर्षी सुमेधाहारितायन यांना केला. श्रीविद्यामाहायोग परंपरेतील या सर्वच आचार्यांनी आपल्या शिष्योपशिष्य क्रमांमधून श्रीविद्यामहायोगाची प्रात्यक्षिक साधना अनवरतपणे चालू ठेवली.
श्रीगुरुदेव श्रीनिवासजी सिद्धाचार्य उर्फ श्रीनिवासजी शामराव काटकर हे वर्तमान काळातील एक अधिकारसंपन्न महायोगी आहेत. त्यांना तामिळनाडू येथील कांची कामकोटी पीठाचे ६८वे आचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती आणि महाराष्ट्रातील सांगलीचे सिद्धमहायोगी सद्गुरुदेव पंडित ईश्वरशास्त्री दीक्षित यांचे कडून दिक्षा आणि मार्गदर्शन मिळाले. अशा रीतीने भगवान श्री दक्षिणामूर्ती परमशिवांनी प्रारंभ केलेली ही दिव्य साधनप्रणाली महर्षि अगस्त्य, महर्षि दुर्वासा, भगवान श्री दत्तात्रेय आणि भगवान श्री परशुराम या अतिप्राचीन काळातील आचार्यांकडून आधुनिक काळातील भगवद्पाद श्री आद्यशंकराचार्य, श्री भास्करराय उर्फ भासुरानंदनाथ ते मुरगोड चे भगवान श्री शिवचिदंबर दीक्षित उपाख्य पूर्णानंदनाथ यांचे पर्यंत पोचली.वर्तमान काळात श्रीगुरुदेव श्रीनिवासजी इच्छुक साधकाना या दिव्य साधनप्रक्रियेचे मार्गदर्शन करीत आहेत.
ज्यांना श्रीविद्यामहायोगअखंडमहायोग परंपरेबद्दल आणखी सविस्तर माहिती हवी आहे आणि परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांच्या मार्गदर्शनाखाली या साधनप्रणालीत प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले “श्रीविद्यामहायोगअखंडमहायोग – एक ऐतिहासिक सिद्धांत” या सदराचे जरूर वाचन करावे.