महायोगी श्रीनिवासजी शामराव काटकर

श्रीगुरुदेव श्रीनिवास सिद्धाचार्य यांचा जन्म १९४६ मध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर असलेल्या सोलापूर शहरात जामदग्न्य वत्स्य गोत्रातंर्गत ऋग्वेद शाकल शाखेतील महाराष्ट्रीय देशस्थ ब्राह्मणवर्णान्तर्गत काटकर कुटुंबात झाला. हे काटकर कुटुंब तुळजापूर जवळील काटी गावचे होते. या कुटुंबाचा पूर्वइतिहास असा की, या कुटुंबातील पूर्वज हे विजयनगरच्या कृष्ण देवरायाच्या दरबारातील विद्वान पंडित होते. पुढे केव्हातरी हे कुटुंब अहमदनगर जवळील जामखेड येथे व त्यानंतर जामखेड वरून तुळजापूर जवळील ‘काटी’ या गावी स्थलांतरित झाले. त्या काळात काटी हे गाव पेशव्यांनी आपला सरदार म्हणून नेमलेल्या गंगाधरपंत नेवाळकरांच्या अधिपत्याखाली होते. हे गंगाधरपंत नेवाळकर म्हणजे झाशींची राणी लक्ष्मीबाई यांचे पती होत. काटकर कुटुंबाच्या घराण्यात अनेक वेदपरायण, श्रौतअग्निहोत्री, योगी, संन्यासी यांनी वेगवेगळ्या काळात जन्म घेतला. असे सांगतात की, काटकरांचे मूळ आडनाव हे ‘होशिंग’ हे असून ते विजयनगरच्या कृष्णदेवरायाच्या दरबारात विद्वान पंडित होते. राजाने त्यांना सोन्याने मढविलेल्या गायी दान केल्या होत्या म्हणून ते होनशिंग, तेच पुढे होशिंग झाले. होशिंग घराण्याची एक शाखा पुढे जांब येथे स्थलांतरीत झाली,जी ‘ठोसर’ या नावाने प्रचलित झाली. असे सांगतात की, याच घराण्यात पुढे समर्थ श्री रामदास स्वामी यांचा जन्म झाला. दुसरी एक शाखा राजस्थान येथील बिकानेर येथे स्थायिक झाली. रामभट्ट होशिंग हे या घराण्यातील आणखीन एक विद्वान पंडित होय. हे नरसिंहाचे भक्त होते व ते बिकानेर संस्थानचा ‘राजा अनुपसिंग’ या राजपूत राजाच्या दरबारातील विद्वान पंडित होते. आणखी एक शाखा अहमदनगर जवळील जामखेड गावी येऊन राहीली. तेथून तुळजापूर येथील काटी या गावी येऊन राहिली तीच पुढे काटीकर अर्थात काटकर या नावाने प्रचलित झाली. काटकर कुटुंबातील आणखीन एक योगी व तपस्वी म्हणून ओळखले जाणारे ‘श्रीगणनाथ श्रीपाद स्वामी ‘ हे कालभैरवाचे निस्सीम भक्त होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात श्रीगणनाथ स्वामींनी संजीवन समाधी घेतली. आजही ती समाधी काटी या गावी काळ भैरवनाथाच्या मंदिरालगत आहे.

या घराण्यातील आणखीन एक सत्पुरुष म्हणजे शामराव उपाख्य भाऊ रामचंद्र काटकर एक दैदिप्यमान नाव होय. हे श्री गुरुदेवांचे खापर पणजोबा होत. भाऊमहाराज काटकर वारकरी संप्रदायातील एक प्रमुख अध्यात्मिक व्यक्तित्व होते. आज जरी वारकरी संप्रदायातील लोकांना त्यांचा विसर पडला असला तरी शंभर वर्षांपूर्वी भाऊ महाराजांनी प्रथमच कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून अद्वैत वेदांत सांगायला सुरुवात केली. भाऊ महाराज हे समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतील संत श्री सखाराम बुवा डोमगावकरांचे शिष्य होते. भाऊ महाराज काटकर यांचा परमहंस श्री हंसराज स्वामी यांच्याशीही जवळचा संबंध होता. हे हंसराज स्वामी हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्यातील परांडा तालुक्यातील एक थोर सत्पुरुष होते. त्या काळात भाऊ महाराज एक प्रभावशाली प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होते. असे सांगतात की, त्यांच्या प्रवचनाला हजारो लोक गर्दी करत असत. वेदांत शास्त्रातील अत्यंत गंभीर व तात्विक विषय अतिशय सोप्या भाषेत संत ज्ञानेश्वर, तुकारामादी संताच्या साहित्यावर आधारित मांडत असत. त्यांनी आयुष्यातील शेवटचा काळ कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथील श्रीशांकरमठामध्ये त्या मठातील आस्थानविद्वानाचे पद भूषवित घालविला . भाऊ महाराज काटकरांनी १८७८ साली संकेश्वर येथे आपला देह सोडला. त्यांची समाधी सोलापुरातील बाजारपेठेत असलेल्या फलटण गल्ली येथील काकडे विठ्ठल मंदिरात आहे.

अशा एका अध्यात्मिक वारसा लाभलेल्या कुटुंबात श्री शामराव गोविंद काटकर व सौभाग्यवती रुक्मिणीबाई काटकर या सत्वशील दांपत्याच्या पोटी १९४६ मध्ये श्री गुरूदेवांचा जन्म झाला. श्री गुरुदेव हे तिसरे अपत्य होय. गुरुदेवांचे वडील हे शांत व सात्विक गृहस्थ असून ते व्यवसायाने काडादी प्रशालेत शिक्षक होते. श्रीगुरुदेवांचे व्यावहारिक नाव हे जरी श्रीनिवास असले तरी लहानपणी त्यांना सर्वजण ‘प्रकाश’ असेच म्हणत असत. गुरुदेवांच्या बालपणी त्यांच्या घरी कायम सत्पुरुष, संत, महात्मे, तपस्वी यांचे येणे-जाणे असायचे. लहानपणापासूनच अध्यात्माचे संस्कार स्वाभाविकपणे त्यांच्यावरती होत होते. घरातील काटेकोरपणे पाळले जाणारे धार्मिक रितीरिवाज व वेगवेगळ्या सत्पुरुषांचा सहवास यातून गुरुदेवांच्या बालमनामध्ये देवाविषयी प्रश्न व जिज्ञासा तयार होऊ लागली होती. स्वभावातील निरीक्षक बुद्धी व वास्तवातील विसंगती यातून गुरुदेवांचे बालमन ढवळून निघत होते. गुरुदेवांच्या या अध्यात्मिक प्रवासात त्यांच्या आजी श्रीमती (गंगाभागीरथी) राधाबाई गोविंदराव काटकर यांचे मोठे योगदान होते व त्यांचा आजही गुरुदेव तितक्याच कृतज्ञतेतून उल्लेख करतात. वयाच्या ८ व्या वर्षी गुरुदेवांचे उपनयन झाले. त्यांना गायत्री मंत्राची दीक्षा त्यांच्या वडिलांकडून मिळाली . श्रीगुरुदेवांच्या विलक्षण मेधाशक्तीचे उदाहरण म्हणजे ते आजहि आपल्या प्रवचनातून विषयाच्या संदर्भात खूप लहानपणीच्या आठवणी तपशिलासह देतात. असो... मुद्दा हा आहे की, स्वभावतः असलेली विलक्षण प्रतिभा, जिज्ञासा व देवाची आवड यातून गुरुदेवांचे बालमन प्रभावित होत होते व संस्कारितही होत होते. एकदा श्रीलक्ष्मीशतीर्थ उपाख्य कुंदापूर स्वामी काटकरांच्या घरी मुक्कामी असतानाचा एक प्रसंग. हे कुंदापूर स्वामी माध्ववैष्णव परंपरेतील संन्यासी महात्मा होते. कृष्णोपासक असल्याने ते कृष्णाची दररोज नित्य उपासना पूजा करत असत. ही नित्यार्चना बालक श्रीनिवास अगदी मन लावून पहात असे. याचे कारण असे की, त्या स्वामींकडे एक मत्स्य शाळीग्राम होता. वैष्णव परंपरेत शाळीग्रामाची पूजा ‘विष्णविग्रह’ म्हणून केली जाते . स्वामीजी गाईच्या दुधाने अभिषेक करीत असत शाळीग्रामावर दुध घातल्यावर ताम्हनात ठेवलेला शाळीग्राम प्रदीक्षणा क्रमाने गरगर फिरत असे . बालक श्रीनिवासाला हे पाहून कुतुहूल वाटत असे. एके दिवशी बालक श्रीनिवासाने कुंदापूर स्वामींना तो शाळीग्राम देण्याची विनंती केली. शाळीग्रामाची केलेली मागणी पाहून स्वामी हसले व क्रोधाचा लटका अविर्भाव आणीत ते म्हणाले की “हा दगड सर्वसामान्य खेळाची वस्तू नसून एक दिव्य वस्तू आहे व त्याची अतिशय श्रद्धेने पूजा केली जाते”. त्या दिवसापासून स्वामीजी बालक श्रीनिवासला पूजेतील दुध प्रसाद म्हुणून प्यायला देत असत. एकदा गुरुदेव श्रीनिवासजींच्या आजी राधाबाईनी स्वामींना विचारले की, तीर्थ प्रसादाचे दुध श्रीनिवासला का देता? तेव्हा स्वामीनी उत्तर दिले की, “हा बालक एके दिवशी एक महान अध्यात्मिक व्यक्ती म्हणून नावारूपाला येईल, हे तीर्थ देवून त्याची शरीर शुद्धी करतो आहे जेणे करून हे शरीर अध्यामिक अनुभव घ्यायला सक्षम होईल”. तात्पर्य हेच कि गुरुदेवांच्या अलौकीक व्यक्तित्वाचे भाकीत अनेक सत्पुरूषांनी केले होते. असाच एक प्रसंग श्रीनिवास ७ वर्षाचा असताना घडला. बालक श्रीनिवासला शंकराचार्य परंपरेतील संकेश्वर मठाचे पीठाधीपती परमपूज्य श्री शिरोळकर स्वामी यांच्याकडे दर्शनासाठी घेवून गेल्यानंतर स्वामी श्रीनिवास कडे बघून हसले व म्हणाले की, हा मुलगा भविष्यात एक महान अध्यामिक व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला येईल, त्यांनी श्रीनिवासाच्या आजीना श्रीनिवासला ‘वसंत’ या नावाने संबोधित करावे अशी आज्ञा केली. त्याचे कारण असे की, वसंत ऋतू प्रमाणे श्रीनिवास हा अनेक लोकांच्या आयुष्यात अध्यात्मिक समृद्धी घडवून आणेल.

वयाच्या ११ व्या वर्षी श्रीनिवासचा संपर्क परम पूज्य श्री निरंजन करमाळकर यांच्याशी आला. त्यांना ‘निरंजन स्वामी’ म्हणून लोक ओळखत असत शुक्रवार पेठेतील श्री गुरुदेवांच्या घरा शेजारील ‘त्रिपुरांतकेश्वर’ मंदिराचे ते पुरोहित होते. स्वामी कट्टर अद्वैती, वेदांती व ब्रह्मनिष्ठ महात्मा होते. रोज सायंकाळी ते वेदांतावर प्रवचन करीत असत . बालवयातून किशोरावस्थेकडे निघालेल्या श्रीनिवासच्या अंतकरणावर अध्यात्मिक बीजारोपण निरंजन स्वामी महाराजांनी एक गुरु व मार्गदर्शक म्हणून केले. निरंजन स्वामींच्या निधनानंतर त्यांची हि प्रवचनाची परंपरा गुरुसेवा म्हणून श्री गुरुदेवांनी वयाच्या १९व्या वर्षी सुरु केली ती आजही गेली ४६ वर्षे अव्याहतपणे चालू आहे. महाविद्यालयीन काही वर्षे व पालघर येथील दोन वर्षे सोडली तर गुरूदेवांच्या या सेवेत कधीही खंड पडला नाही. १९६८ साली शुक्रवारपेठ, सोलापूर येथील श्रीत्रिपुरांतकेश्वर महादेव मंदिरात गुरुदेवांनी ज्ञानेश्वरी वर प्रवचन सांगायला सुरुवात केली. त्यावेळी श्रीगुरुदेव श्रीनिवासजी उर्फ प्रकाश काटकर हे महाविद्यालयीन युवक अर्थात् कॉलेज विद्यार्थी होते. गुरुदेवांच्या लोकोत्तर व्यक्तित्वाचे याहून दुसरे प्रमाण नाही. जुन्या अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गुरुदेवांनी दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेतला. तत्वज्ञान विषय घेवून ते बी.ए. झाले. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. एम.ए. ही पदवी सुवर्ण पदकासह मिळविली . सध्याच्या ठाणे जिल्ह्यातील पालघर येथील कै. मामासाहेब दांडेकर महाविद्यालयातून तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक म्हणून व्यवसायिक जीवनाची सुरुवात केली. पुढे दोन वर्षांनी सोलापुरातील दयानंद महाविद्यालय येथे रुजू झाले व पुढे २००६ साली श्री गुरुदेव तत्वज्ञान विषयाचे विभाग प्रमुख म्हणून निवृत्तहि झाले. १९७६ साली श्री गुरूदेवांचा विवाह पुण्याच्या सौ.कां. सुलक्षणा पुंडले यांच्याशी झाला. हे पुंडले घराणे चिंचवडचे गाणपत्य परंपरेतील थोर सत्पुरुष श्री मोरया गोसावी महाराज यांचे अनुग्रहित असून स्वामींना साक्षात गणपती कडून प्रसाद म्हणून मिळालेल्या तीन तांदळापैकी एक गणपतीचा तांदळा यांच्या घराण्यात आजही नित्यपूजेत आहे. असो, सांगण्याचे तात्पर्य इतकेच गुरुमाताही अशाच एका कृपांकित परंपरेतील होत्या . पुढे यथावकाश चि. अनिरुद्ध व कु. गायत्री हि दोन अपत्ये झाली . आपल्या आयुष्याच्या प्रवासात एका बाजूने श्री गुरुदेव श्रीनिवासजी उत्तम कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या कर्तव्याचे निर्वाह करीत होते व दुस-या बाजूने त्यांच्या अंतरंगातील पारमार्थिक अभिप्सा जिज्ञासा त्यांना अनेक संतमहात्मे, तपस्वी महात्म्यांच्या संपर्कात आणीत होती, त्यांच्या सहवासातून, प्रासंगिक भेटीतून ती अभिप्सा तैलधारावत वाढतच होती व व्यापकही होत होती. निरंजन स्वामींच्या सहवासात झालेला वेदांताचा संस्कार दृढ झाला होता. जिथे जिथे लोकविलक्षण म्हणून काही असायचे तिथे भेटी देणे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे हाही उद्योग चालू होता

पुढे साधारण १९७५ मध्ये गुरुदेव त्यांच्या आजी बरोबर तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी यात्रेस गेले असता कांचीपुरम येथे श्री गुरूदेवांना कांचीकामकोठी पीठाचे ६८ वे शंकराचार्य परमपूज्य श्री चन्द्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी यांची भेट झाली. कांचीचे परमाचार्य त्यावेळी कांचीपुरम जवळ असलेल्या ‘कलवई’ गावातील मंदिरात राहत होते. त्यांच्या प्रथम भेटीतच गुरुदेव श्रीनिवासजींना परामाचार्यांनी श्रीविद्याअखंडमहायोग साधन परंपरेतील वेध दीक्षा देवून प्रवेश दिला व दीक्षित केले. गुरुदेव श्रीनिवासजींची महायोग साधना परमाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली . १९७५ ते १९९४ पर्यंत श्री गुरुदेव हे कांची स्वामींच्या सहवासात सतत येत राहिले. १९७८ ते १९८३ य काळात परमाचार्यांची पदयात्रा तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून जात होती. कांची महास्वामी जिथे जिथे आपल्या निवडक सेवेक-यांसोबत पायी प्रवास करीत जायचे, तिथे तिथे गुरुदेव त्यांना भेटण्याच्या ओढीने जात होते. कांची स्वामींच्या सहवासातून व मार्गदर्शनातून गुरूदेवांचा महायोग साधन प्रवासही उत्तरोत्तर अग्रेसर होत होता व ते आपल्या संसारिक जबाबदा-याही पार पाडीत होते. . कांची परमाचार्यांचे एका अंगाने कडक, काटेकोर, शिस्तबद्ध , तपस्वी ऋषीतुल्य योग्याचे जीवन होते तर दुस-या अंगाने एका विलक्षण करुणामय, दयाळू, कृपाकटाक्षाने पीडितांचे दुःख संपविणारे अलौकिक महात्मा होते. भक्तगण त्यांना ‘चालता बोलता देवच’ म्हणत. त्यांनी आपल्या कृपासामर्थ्याने अनेक दुखी जनांच्या आयुष्यात, संसारात आनंद मोद प्रगट केला. प्राचीन सनातन धर्म पुन्हा जागविण्यासाठीच स्वामींचे अवतरण झाले होते. १९८० साली कांची स्वामींनी श्रीगुरुदेवांना साधनेतील पुढील मार्गदर्शन सांगलीचे महायोगीवरेण्य पंडित श्री ईश्वरशास्त्री दीक्षित यांच्याकडे जावून घेण्याचा आदेश दिला. सांगलीचे ईश्वरशास्त्री दीक्षित यांच्या आईकडील कुलपरंपरा चिदंबर महास्वामीशी संबंधित होती. पंडित ईश्वरशास्त्री दीक्षित हे शुक्ल यजुर्वेदीय काण्व शाखीय अग्निहोत्री ब्राम्हण होते. ते वेदशास्त्र संपन्न, षडदर्शन निपुण विद्वान तर होतेच पण श्रीविद्यामहायोग परंपरेतील चारही योग प्रकारात निष्णात असे आचार्य व महायोगी होते. चित्शक्ती भगवती श्री त्रिपुरसुंदरीच्या भक्तीत रममाण झालेले महान भक्तही होते . परमपूज्य श्री ईश्वरशास्त्री दीक्षित उपाख्य श्री योगेश्वर महाराज यांचेकडून दिनांक ११ मे १९८४, हिंदू कालगणनेनुसार वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी या महापर्वात श्री गुरुदेवांना श्रीविद्याअखंडमहायोग साधनेतील अंतिम टप्पा सपत्नीक मिळाला. अंतिम टप्प्यातील दीक्षेमुळे श्री गुरुदेव आचार्य पदी विराजमान होऊन “सकल अशेष साधानोपदेशाचे” अधिकारी झाले. एवढेच नव्हे तर त्यांना “सिद्धाचार्य” पदवी त्यांच्या गुरुंनी बहाल केली. श्री गुरुदेव श्रीनिवासजी गुरुपदाला पोहचले तरीही आपल्या दोन्हीही सद्गुरूंच्या सहवासात होतेच. १९८८ मध्ये परमपूज्य ईश्वरशास्त्री दीक्षित स्वामींनी व १९९४ मध्ये मध्ये कांची स्वामींनी देह ठेवला.

गुरुदेवांचे आयुष्य साधारणतः तीन टप्प्यामध्ये विभागता येईल. गुरुदेवांचे बालपण; त्यांचे तरुणपणातील महविद्यालयीन शिक्षण व त्यानंतर नोकरी व विवाह. पुढे कांची शंकराचार्य श्री चन्द्रशेखर स्वामी महाराजांची भेट; त्यानंतर सांगली चे श्री योगेश्वरदीक्षित स्वामी महाराजांची भेट सहवास. हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा निवृत्ती नंतरचे आयुष्य होय. एका बाजूने गुरुदेव आपल्या महाविद्यालयातील ‘तत्वज्ञान’ हा विषय विद्यार्थ्याना अतिशय सोप्या व सुबोध भाषेत सांगायचे . आपली महाविद्यालयीन जबाबदारी अतिशय निष्ठेने व कुशलतेने त्यांनी पार पाडली. दुस-रा बाजूने अतंरंग स्तरावर एका दिव्य परंपरेतील साधकाचे आयुष्य व बहिरंगातून एका महाविद्यालयीन विद्वान प्राध्यापकाचे आयुष्य जगताना आपली हि व्यावहारिक भूमिकाही गुरुदेवांनी अतिशय कुशलतेने सांभाळली. ३४ वर्षाच्या आपल्या महाविद्यालयीन जीवनात गुरुदेवांना संदर्भासाठी पुस्तक वाचून कधी वर्गात तास घेताना कुणीही पहिले नाही. मागच्या तासात विषय जिथे थांबला तिथून पुढे सुरुवात व्हायची. हा क्रम त्यांच्या हाताखालून शिकलेल्या प्रत्येक मुलानी पाहिला. किंबहुना, त्यांच्या महाविद्यालयातील सहकारी प्रध्यापाकांनाही गुरुदेवांच्या अतंरंग व्यक्तित्वाचा कधीही अंदाज आला नाही. १९९५ नंतर महाविद्यालयातील काही प्राध्यापक गुरुदेवांच्या संपर्कात आले व पुढे ते त्यांचे अनुग्रहित शिष्यही झाले. इकडे प्रपंचात गुरुदेवांची दोन्हीही मुले चि. अनिरुद्ध व कु. गौरी आपले इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण करून व्यावहारिक आयुष्यात स्थिर झाली. मोठा मुलगा टाटा टेक्नॉलॉजी येथे मोठ्या पदावर आहे व मुलगी गौरी इन्फोसिस या कंपनीत मोठ्या पदावर काम करत आहे. आपला प्रपंच यशस्वी होण्याचे सारे श्रेय श्रीगुरुदेव मोठ्या कृतज्ञतेतून गुरुमातांना देतात. श्रीगुरुदेव विविध योगसाधना, उपासना, प्रवचनादीक अनुष्ठान या सा-यात व्यस्त असायचे तर संसारातील सारी कर्तव्ये व जबाबदारी अतिशय आनंदाने शांतपणे गुरुमातांनी निष्ठेने सांभाळली. आपला प्रपंच हीच साधना भूमी बनवून गुरुदेवांना समर्थपणे सोबत केली. ८ सप्टेंबर २००८ भाद्रपद शुद्ध नवमीला गुरुमाता शांतपणे आनंदाने देवाघरी गेल्या. वर उल्ल्खे केल्या प्रमाणे गुरुदेवांनी आपल्या ४६ वर्षाच्या प्रवचन सेवेत विविध ग्रंधावर भाष्य केले . १९६८ साली साली सुरु झालेल्या ज्ञानेश्वरी वर १३ वर्षे विवेचन चालू होते. ५ सप्टेंबर १९८१ ला ज्ञानेश्वरीवर विवेचन पूर्ण झाले. त्यानंतर हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी असे ग्रंथ विवेचनासाठी घेतले . पातंजल योग सूत्रांवर जानेवारी १९८७ ते १९९५ पर्यंत त्यांनी जवळजवळ ८ वर्षे प्रवचने केली. त्यातील ब्रह्मचर्य या एका विषयावर दोन वर्षे विवेचन चालू होते . त्यानंतर श्रीविद्या महायोग परंपरेतील साधना व सिद्धांत यावर प्रकाश टाकणा-या भगवान श्रीदत्तात्रेय व भगवान श्रीपरशुराम यांच्या संवादावर आधारलेल्या भगवान श्रीसुमेधा हारीतायन महर्षींनी रचलेल्या “त्रिपुरारहस्य” या ग्रंथातील ज्ञानखंडावर १९९५ ते फेब्रुवारी २०१० पर्यंत विवेचन केले. ७ फेब्रुवारी २०१० रोजी भगवान ज्ञानेश्वरांच्या आज्ञेने श्रीविद्या महायोगाचा निर्देश करणारी ३६० सूत्रात्मक ज्ञानेश्वरी चे विवेचन पुन्हा सुरु केले. हे विवेचन सध्या १२ व्या सूत्रापर्यंत आले आहे.

याच बरोबर गुरुदेव सध्या आपल्या पुणे येथे मुक्कामास असताना श्री रामकृष्ण पागे यांच्या निवासस्थानी भगवद्गीता या ग्रंथावर विवेचन करतात. गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली महायोग परंपरेतील विविध गुप्त ध्यान पद्धती उलगडून दाखविणारी विविध प्रात्यक्षिकासह साधना शिबिरे श्रीविद्या महायोग साधक सभेच्या वतीने आयोजित केली जातात. सदर शिबिरांचे आयोजन अमेरिकेतही झाले आहेत. भारतात पुणे व सोलापूर येथे जिज्ञासू दीक्षित साधकांच्या विनंती नुसार शिबिरांचे आयोजन केले जाते. १९८९ पासून आपल्या दोन्ही गुरुदेवांच्याच्या आज्ञेनुसार अधिकारानुरूप जिज्ञासू साधकांना दीक्षा द्यावयास सुरुवात केली. लौकिक कामना घेवून येणा-या भाविकांना हि गुरुदेव मार्गदर्शन करत असत व आताही करतात. आर्त - अर्थार्थी - मोक्षेच्छुक जिज्ञासू भाविकांना त्यांच्या अधिकारानुरूप मार्गदर्शन करत असतात. विशुद्ध परमार्थाची अभिप्सा जिथे दिसेल तिथे अनुग्रहही करतात. ज्या अध्यात्म विषयावर गुरूदेवांची वाणी निरंतर एखाद्या नदीच्या धारे प्रमाणे प्रवाहित आहे, ते अध्यात्म केवळ बोलघेवडेपणा नाही. ‘त्या विशुद्ध सच्चिदानंदाचा साध्या भाषेत देवाचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्याकडे या पण आपले मन भूतकाळाच्या सगळ्या प्रभावातून मुक्त करून प्रामणिक श्रद्धा व विशुद्ध जिज्ञासा घेवून आलात तर मी तुम्हाला देवाचा अनुभव देवू शकतो’ हे गुरुदेवांचे वचन ज्याला आयुष्यात आपले परम कल्याण करावायचे आहे, त्याच्यासाठी प्रेरक आहे.

मराठी