
श्रीविद्यामहायोग - ऐतिहासिक माहिती व सिद्धांत

भगवान परमशिव दक्षिणामूर्ती
श्रीविद्याअखंडमहायोग या अध्यात्मिक साधन पद्धतीचे प्रणयन देवता ,सिद्ध व मानव यांच्यामध्ये करण्याचा प्रारंभ या विद्यमान वैवस्वत मन्वंतरामध्ये आदिविश्वमहागुरू भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्ती यांनी केला. श्रीविद्याअखंडमहायोगाचे आद्य आचार्य भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्ती हे होत. सच्चिदानंदस्वरूप परमार्थतत्वाचा सर्वोच्च ,परिपूर्ण साक्षात्कार प्राप्त व्हावा अशा तीव्र अभिप्सेने युक्त असलेल्या जिज्ञासू साधकांसाठी भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्तिंनी “श्रीविद्याअखंडमहायोग” ही साधनापद्धती सर्वप्रथम प्रचारात आणली. श्रीविद्याअखंडमहायोग हा विशेष योगप्रकार श्रीविद्यामहायोग, श्री ब्रह्मविद्यामहायोग आणि महायोग अशा इतरही नावांनी पारमार्थिक साधकांच्या समुहात ओळखला जातो.
श्रीविद्या म्हणजे चित्शक्ती होय .परब्रम्ह ,परमात्मा, भगवत्स्वरूप सच्चिदानंदाची दिव्य चेतन शक्ती म्हणजेच श्रीविद्या होय. ज्याप्रमाणे ज्वलनशक्ती ही अग्नीची स्वाभाविक शक्ती आहे, अंधारनिवारक प्रकाशशक्ती ही जशी सूर्याची स्वाभाविक शक्ती आहे, त्याप्रमाणे श्रीविद्या ही सच्चिदानंद परब्रम्हाची अंगभूत स्वाभाविक शक्ती होय. म्हणून श्रीविद्येला ब्रह्मविद्या असेही म्हणतात. परमार्थतत्वाच्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान अशा त्रिविध रूपांना प्रकाशित करणारी श्रीविद्यासुद्धा त्रिविध स्वरुपाची समीष्टीरूपिनी प्रज्ञा म्हणजेच श्रीविद्या होय.
ही दिव्यप्रज्ञारूपिनी श्रीविद्या जेव्हा साधकाच्या अंत:करणात प्रवेश करते तेव्हा तिच्या प्रकाशात साधक परमार्थतत्वाच्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान अशा त्रिविध स्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त करून घेतो. निर्गुणनिराकारपरब्रह्मासी मी नित्य अभिन्न एकरूपच आहे, हे प्रज्ञान म्हणजे पराविद्या होय. सगुणनिराकार अनंतशक्तीसंपन्न परमात्म्याचा मी अंश असून त्या परमेश्वराशी माझे सादृश्य अथवा साध्यर्म आहे, अशा आकाराने स्फुरणारे साक्षात्कारी प्रज्ञान म्हणजेच परापराविद्या होय. तर निष्काम प्रेमी स्वरूप सगुण साकार, दिव्यव्यक्तीसंपन्न भगवंताशी अथवा भगवतीशी माझे स्वाभाविक अखंड सामीप्य आहे, असे साधकाच्या अंत:करणामध्ये स्फुरणारे साक्षात्कारी प्रज्ञान म्हणजेच अपराविद्या होय. या त्रिविध दिव्य विद्याची समष्टी म्हणजेच श्रीविद्या होय. या दिव्य श्रीविद्येचा प्रकाश साधकाच्या अंतःकरणामध्ये घडवून आणून तिच्या प्रकाशामध्ये साधकाला त्याचे परब्रम्हतत्वाशी असलेले अभेद संबंधनात्मक सायुज्य, त्याचे परमात्मतत्वाशी असलेले भेदाभेदात्म्क संबंधातील सादृश्य आणि भगवत्तत्वाबरोबर असलेले भेद संबंधातील सामीप्य त्या साधकाच्या अनुभवकक्षेमध्ये आणणे हे श्रीविद्यामहायोग साधनेचे प्रयोजन आहे.
इतर सर्वच साधना पद्धतीप्रमाणे श्रीविद्याअखंडमहायोग साधना पद्धतीची बीजेसुद्धा प्राचीन वेदांमध्ये आहेत. अर्थात श्रीविद्यामहायोग साधना ही परिपूर्ण वेदमूलक आहे. श्रीविद्यामहायोग साधन परंपरा वेदमूलक सनातन धर्म परंपरेचा एक भव्य, व्यापक अविष्कार आहे. अनादि अशा श्रुती अथवा वेदांपासून उगम पावलेली श्रीविद्यामहायोग परंपरा कालौघामधून विविध स्मृती, पुराणे तंत्रादि आगम ग्रंथ अशा विविध ऋषी व देवताप्रणित साहित्यामधून विकसीत होत गेली. या साधनापद्धतीने अध्यात्मीक जीवन व साधना यांच्यासंबंधी एक सर्वसमावेशक अशा व्यापक दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला आहे. श्रीविद्यामहायोग परंपरेचा हा व्यापक दृष्टीकोन तिच्या परमार्थतत्वाविषयीच्या सिद्धांतामधून दिसून येतो. सच्चिदानंद तत्व हे केवळ निर्गुणच आहे अथवा निराकारच आहे; ते केवळ विश्वरुपच अथवा विश्वातीत आहे असा परमार्थतत्वासंबंधीचा एकांगी दृष्टीकोन श्रीविद्यामहायोग परंपरेने स्वीकारलेला नाही. या परंपरेचा परमार्थतत्वाविषयी असा सिद्धांत आहे की, परमार्थ तत्व हे जसे निर्गुण निराकार आहे तसेच ते सगुण साकारही आहे. ते जसे विश्वरूप आहे तसेच ते विश्वातीत आहे. ते परमार्थतत्व समस्त जीवप्रकृरतीत अनुस्यूत असलेल्या मर्यादांच्या पलिकडे असलेले व्यक्तीत्वहीन परब्रह्म आहेच परंतु तेच परमार्थतत्व दिव्य व्यक्तीत्व धारण करून भगवान किवा भगवती या स्वरुपात पृथ्वीवर अवतीर्णही होते आणि दिव्य अथवा देवमानवाचा आदर्श सर्व जगासमोर प्रस्तुत ही करते. निर्गुणनिराकारपरब्रह्म, सगुणनिराकारपरमात्मा आणि सगुणसाकारभगवान ही तिनही रूपे त्या एका अखंड परमार्थतत्वाचीच त्रीविध अंगे होत. यातील कोणतेही एक अंग अधिक सत्य किंवा अधिक श्रेयस्कर आहे असे नसून परमार्थतत्वाची ही तिनही अंगे परिपूर्ण सत्य व सारख्याच प्रमाणात श्रेयस्कर आहेत. यापैकी कोणत्याही एकाच अंगाचा साक्षात्कार करून घेण्यात व त्या साक्षात्कारापर्यंतच थांबण्यात पारमार्थिक प्रज्ञानाची पूर्णता गाठली जात नाही. केवळ निर्गुणनिराकारपरब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्यातच धन्यता मानणे अथवा परमार्थतत्वाचा सगुण साकार अविष्कार असलेल्या भगवत्विग्रह स्वरूप देवीदेवतांच्या साक्षात्कारामध्येच मन रमून राहणे ही पारमार्थिक प्रज्ञानाची अपूर्णता होय, असा श्रीविद्यामहायोग परंपरेचा दृष्टीकोन आहे. श्रीविद्यामहायोगाच्या साधकाने सगुणसाकार भगवंताचा साक्षात्कार करून घ्यावा; सगुणनिराकार परमात्मतत्वाचा सुद्धा साक्षात्कार करून घ्यावा; त्याचबरोबर निर्गुणनिराकारपरब्रह्मचा साक्षात्कार प्राप्त करून घ्यावा. निष्कर्ष असा की, निर्गुणनिराकारस्वरूप परब्रह्म, सगुण निराकार स्वरूप परमात्मा आणि सगुणसाकार स्वरूप भगवान या परमार्थतत्वाच्या तिनही स्वरूपांची अनुभूती प्राप्त करून घेणे यामध्येच पारमार्थिक साक्षात्काराची परिपूर्णता आहे असा श्रीविद्यामहायोग परंपरेतील आचार्यांचा दृष्टीकोन आहे. श्रीविद्यामहायोग साधनेमध्ये प्रवेश करू इच्छिनाऱ्या जिज्ञासू साधकाने आपले मन सर्व प्रकारच्या पूर्वग्रहापासून मुक्त ठेवले पाहिजे की जेणेकरून त्याला सच्चिदानंद परमार्थतत्वाच्या या तिनही स्वरूपाचा सारख्याच तन्मयतेने, समरसतेने आस्वाद घेता आला पाहिजे. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या परमार्थतत्वाच्या प्रत्येक स्वरूपाचा सारख्याच समरसतेने आस्वाद घेताना त्यातील कोणत्यातरी एकाच स्वरूपाच्या परमार्थतत्वाच्या प्राप्त असलेल्या पारमार्थिक अनुभूतीचा पूर्ण समरसतेने आस्वाद घेण्याबरोबरच परमार्थतत्वाच्या पूर्वी अनुभवात न आलेल्या अशा नूतन स्वरूपाचा अनुभव घेण्याविषयीसुद्धा मन तितकेच उत्सुक, जिज्ञासू असणेइतपत महायोग साधकांचे मन सर्वप्रकारच्या पूर्वग्रह, पूर्वसंस्कार यांच्या प्रभावातून मुक्त असले पाहिजे. असे मुक्त झालेले मनच निर्गुणनिराकार ब्रह्मतत्वाशी असलेला अभेदात्मक संबंध जितक्या उत्कट आनंदाने अनुभवते तितक्याच उत्कट आनंदाने ते मन सगुणनिराकार परमात्म्याबरोबर असलेले आपले दिव्य सादृश्य अनुभवू शकते आणि तितक्याच उत्कट आनंदाने सगुणसाकारस्वरूप निष्कामप्रेमी असलेल्या भगवंताच्या मधुर सानिध्याचेसुद्धा आस्वादन घेवू शकते.
पारमार्थिकसाधनांच्या संदर्भातसुद्धा श्रीविद्यामहायोगाचा दृष्टीकोन व्यापक व समन्वयशील असा आहे. या साधनेमध्ये राजयोग, हठयोग, मंत्रयोग, लययोग अशा चारही मुख्य योगप्रकारातील आवश्यक तेवढया योगप्रक्रियांचा स्वीकार करून वरील चारही योगप्रकारांचा समन्वय साधण्यात आलेला आहे. राजयोगातील चित्तस्थैर्याचे महत्व, हटयोगातील प्राणसंयमाचे महत्व, मंत्रयोगातील वाक्तत्वाची शुद्धी व त्याद्वारे मन व प्राण यांची परस्पर सुसंगत सांगड घालण्यावर दिला जाणारा भर, लययोगातील अपूर्णाहंतास्वरूप जीवाची शुद्धी व त्याद्वारे त्याचा पूर्णाहंतास्वरूप परमशिवामध्ये करावयाचा लय अथवा परिसमाप्ती या सर्व प्रक्रियांना श्रीविद्यासाधनेमध्ये महत्वपूर्ण स्थान देण्यात आलेले असल्यामुळे श्रीविद्यामहायोग या वर उल्लेखिलेल्या चारही योगांचे व्यापक व सर्वसमावेशक स्वरूप आहे, असे म्हणता येईल. किंबहुना श्रीविद्यासाधनेला ‘महायोगसाधना’ म्हणण्याचे कारणच मुळी हे आहे की, श्रीविद्यामहायोग साधना वर उल्लेखिलेल्या चारही मुख्य योग प्रकारचे समन्वयात्मक रूप आहे. कर्ममार्गातील तपस्यारत क्रियाशीलता, ज्ञानमार्गातील परमार्थतत्वाच्या अनुसंधानामध्ये तत्पर असलेली स्वाध्यायशील बुद्धी आणि भक्तीमार्गातील ईश्वरप्रणिधानाचे प्राणतत्व असणारी समर्पणशील मनोवृत्ती या तिन्हीचा संगम श्रीविद्यामहायोगसाधनेमध्ये तत्पर होवू इच्छिणाऱ्या साधकाच्या साधनामय जीवनामध्ये होणे अपेक्षित असते. याही अर्थाने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग इ. विविध योगपद्धतीचा समन्वय श्रीविद्यायोग साधनेमध्ये होत असल्याने या साधनेला ‘महायोग’ अशी अशी अन्वर्थक संज्ञा लाभलेली आहे. श्रीविद्यामहायोगसाधनेला ‘श्रीविद्याअखंडमहायोग’ याही नावाने ओळखले जाते. अखंड अर्थात समग्र मानवी प्रकृतीलाच परिशुद्ध, दिव्य बनवून तिला परमार्थतत्वाच्या परिपूर्ण साक्षात्काराचे साधन बनविले पाहिजे. मानवी प्रकृतीमधला कोणताही घटक परमार्थ साक्षात्काराला निरुपयोगी किंवा प्रतिकूल न मानता त्यातील प्रत्येक घटकांचा परमार्थ साधनेसाठी व त्याद्वारे उच्चतम पारमार्थिक साक्षात्कार प्राप्त करून घेण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. सप्तधातूमय स्थूल शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, चित्त व अहंकार या सर्वांची समष्टी मिळून मानवी प्रकृती घटीत होते. श्रीविद्यामहायोगाच्या साधनेत प्रवृत्त होऊ इच्छिणाऱ्या व होणाऱ्या साधकांनी आपल्या मानवी प्रकृतीमधील वरील प्रत्येक घटकांचा कुशलतेने उपयोग करून त्यांना साक्षात्काराचे साधन बनविले पाहिजे. असा श्रीविद्यामहायोगाचा दृष्टीकोन असल्याने या साधनेला “श्रीविद्याअखंडमहायोग” असेही म्हटले जाते.
श्रीविद्यामहायोग साधनक्रमात प्रवेश करून वर वर्णिलेल्या परमार्थ तत्वाच्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या त्रीविध स्वरूपाचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार करून घेण्याचा अधिकार प्रत्येक मानव मात्राला आहे, वर्ण, आश्रम, जात, पोटजात, लिंग, भाषा, धर्म, राष्ट्रीयता, वंश यासारख्या धार्मिक, सामजिक मर्यादांमध्ये श्रीविद्यामहायोगसाधना संकुचित झालेली नाही. अशा सर्व धार्मिक, सामजिक परंपराना ओलांडून श्रीविद्यामहायोग परंपरा समस्त मानवमात्र स्त्री-पुरुषांना महायोग साधनेत प्रवेश करून साधना करण्याचा अधिकार देते. अमुक एक व्यक्ती, अमुक एका जातीय, धार्मिक भाषिक व राष्ट्रीय वर्गाचा घटक आहे अथवा नाही म्हणून त्या व्यक्तीला श्रीविद्यामहायोगसाधनेमध्ये प्रवेश दिला जातो अगर नाही असे नाही. श्रीविद्यामहायोग साधनेत प्रवेश करण्यासाठी वर्ण, आश्रम, जात, लिंग, वय, भाषा, राष्ट्रीयता इत्यादीमुळे होणारे सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक भेद हे पूर्णपणे अप्रस्तुत आहेत. एवढाच या सर्व कथनाचा आशय आहे. परमार्थतत्वाच्या परिपूर्णतम साक्षात्कारची प्रबळ अभिप्सा असेल व त्यासाठी स्थूलतम देहापासून सूक्ष्मतम अहंकारपर्यंत सर्वच व्यक्तित्व घटकांचे शुद्धीकरण, दिव्यीकरण करू शकणारी सर्वांगीण म्हणूनच जटील असणारी योगसाधना करण्याची दृढतम इच्छाशक्ती असेल तर कोणतीही व्यक्ती या साधनक्रमामध्ये प्रवेश करून परमार्थतत्वाचा परिपूर्ण साक्षात्कार करून घेवू शकते व त्यासाठी तिला वर्ण, आश्रम, जात, धर्म, भाषा, राष्ट्रीयतत्व, लिंग, वंश यासारख्या कोणत्याही सामाजिक, धार्मिक भेदांची आडकाठी येत नाही.
श्रीविद्याअखंडमहायोग परंपरेतील असलेल्या सद्गुरूंचे स्थान सर्वतोपरी महत्वाचे आहे. श्रीविद्यामहायोगपरंपरेमध्ये दीक्षित होवून महायोगीपद प्राप्त करून घेतलेल्या सद्गुरूंकडून दीक्षा घेतलेल्या दीक्षित साधकांनाच श्रीविद्यामहायोगपरंपरेत प्रवेश करून आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार महायोग साधना करण्याचा अधिकार प्राप्त होतो. श्रेष्ठ अशा महायोगी सद्गुरूंकडून प्राप्त होणाऱ्या दीक्षेच्याअभावी कोणाही व्यक्तीला श्रीविद्यामहायोगसाधनेमध्ये प्रवृत्त होण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. महायोगी सद्गुरूंच्या कृपेवाचून या साधनेमध्ये प्रवेश करणे व ती साधना करून पूर्णतेला जाणे सर्वथैव अशक्य आहे. महायोग सद्गुरू दीक्षेद्वारे शिष्यामध्ये आपल्या अनंतकृपाशक्तीचे संक्रमण करतात. सद्गुरूंकडून संक्रमित झालेली ती दिव्य अनुग्राहक शक्तीच साधकाच्या समग्र साधनामय जीवनाचा दृढतम आधार असतो. महायोगी सद्गुरूंच्या कृपाशक्तीच्या दृढतम पायावरच दीक्षित साधक स्वप्रयत्नाने स्वतःच्या साधनेचा प्रासाद उभा करीत असतो. सारांश असा की, श्रीविद्यामहायोगसाधनपरंपरेमध्ये दिक्षेद्वारे अनुग्रह करणाऱ्या सद्गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे.
आपण प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे श्रीविद्याअखंडमाहायोग साधनक्रमाचे आद्यप्रणेते भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्ती हे होत. भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्तिंनी श्रीविद्यामाहायोगाचा उपदेश महासती अनसूया आणि महर्षि अत्री यांचे पुत्र आणि ब्रम्हा, विष्णू व महेश यांचा अवतार असलेले भगवान श्रीदत्तात्रेय यांना केला. भगवान श्री दत्तात्रेयांनी परमशिवापासून त्यांना मिळालेल्या या विद्येचा उपदेश त्यांचे शिष्य असलेल्या रेणुकानंदन जमदग्नीपुत्र भार्गव परशुरामांना केला. भार्गव परशुराम भगवान महाविष्णुच्या दहा प्रमुख अवतारापैकी सहावे अवतार होत. भगवान भार्गव परशुरामांनी या महायोगाचा उपदेश त्यांचे शिष्योत्तम श्रीमन् महर्षी सुमेधाहारितायन यांना केला. श्रीविद्यामाहायोग परंपरेतील या सर्वच आचार्यांनी आपल्या शिष्योपशिष्य क्रमांमधून श्रीविद्यामहायोगाची प्रात्यक्षिक साधना अनवरतपणे चालू तर ठेवलीच परंतु त्याचबरोबर भावी पिढ्यांना श्रीविद्यामहायोग साधनक्रमाचा परिचय व्हावा म्हणून महत्वपूर्ण अशी ग्रंथरचनाही केली. भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्तिंनी श्रीविद्यामाहायोग साधनेशी संबंधित असलेल्या ‘दक्षिणामूर्तींसंहिता’ हा ग्रंथ लिहिला. त्यांचे शिष्य भगवान श्री दत्तात्रेयांनी अठरा हजार श्लोकात असलेला ‘दत्तासंहिता’ हा ग्रंथ लिहिला व त्या ग्रंथाव्दारे श्रीविद्यामाहायोगाच्या सैद्धांतिक व साधनात्मक बाजूंचे स्पष्टीकरण केले. दत्तसंहितेमधील विषय अधिक सुलभरीतीने स्पष्ट करण्यासाठी भगवान दत्तात्रेयांचे शिष्योत्तम भार्गव जामदग्न्य श्रीपरशुराम यांनी पन्नास खंडामध्ये विभाजित झालेला ‘परशुरामकल्पसूत्र’ हा ग्रंथ लिहिला. या परशुरामकल्पसूत्राचेच सुलभीकरण करून त्याला दहा खंडात्मक सुटसुटीत स्वरूपाच्या ग्रंथामध्ये रूपांतरित करण्याचे कार्य भगवान परशुरामाचे शिष्योत्तम श्रीमन् महर्षि सुमेधा हरितायान यांनी केले. इतकेच नव्हे तर भगवान श्री दत्तात्रेयांनी भगवान श्री परशुरामांना ज्या श्रीविद्यामहायोग साधनेचा उपदेश केला तो ‘त्रिपुरारहस्य’ या ग्रंथरूपाने सर्व जिज्ञासू साधकांपुढे मांडण्याचे कार्य श्रीमन् महर्षी सुमेधा हारितायन यांनी केले. ‘त्रिपुरारहस्य’ हा ग्रंथ भगवान श्री दत्तात्रेय आणि भगवान श्री परशुराम यांच्या सवांदावर आधारलेला आहे. पारमार्थिक सत्याचे स्वरूप काय? चित्तशक्ती म्हणजे काय? चित्तशक्तीचा पारमार्थिक सत्याशी नेमका संबंध कसा आहे? प्रतीतीला येणारे जगत आणि त्या जगामध्ये जन्माला येऊन सुख-दु:ख अनुभविणारे जीव याचा त्या श्रीविद्याचित्शक्तीशी नेमका संबध कसा आहे? जीवनाचे वास्तव प्रयोजन कोणते आहे? खरे प्रेम, वास्तव आनंद नेमका कसा मिळेल? दुःखाचे मूळ कारण कोणते? व त्याच्या अत्यंतिक निवृत्तीचा नेमका उपाय कोणता आहे? यासारख्या अत्यंत मूलभूत व गंभीर प्रश्नाची चर्चा भगवान श्री परशुराम व भगवान श्री दत्तात्रेय या दोघांमध्ये झाली. त्या चर्चेमधून जीव, जगत् आणि जगदीश्वर या संबंधात जे प्रज्ञान प्रकट झाले त्याचेच स्पष्टीकरण करण्यासाठी विश्वविधाता भगवान ब्रह्मदेवाच्या आज्ञेने महर्षि सुमेधा हरितायन यांनी ‘त्रिपुरारहस्य’ या ग्रंथराजाची निर्मीती केली. हा ग्रंथ ‘ज्ञानखंड’, ‘चर्याखंड’ आणि ‘महात्म्यखंड’ या तीन खंडांमधून विभागलेला आहे. ‘ज्ञानखंडा’ मधून श्रीविद्यामहायोगाच्या सैद्धान्तिक बाजूचे स्पष्टीकरण केलेले आहे तर ‘चर्याखंडा’ मधून श्रीविद्यामहायोगाच्या प्रात्यक्षिक साधनात्मक बाजूवर प्रकाश टाकलेला आहे. तर ‘महात्म्यखंड’ मध्ये श्रीविद्याभगवती चित्शक्तीच्या विविध अवताराचे आणि त्या सगुणसाकार अवतरणामधून चित्शक्तीने केलेल्या विविध दिव्य लीलांचे वर्णन आलेले आहे. वरील तीन खंडापैकी ‘चर्याखंड’ लुप्त झालेला आहे. तो आज उपलब्ध होत नाही. त्रिपुरारहस्याचा ज्ञानखंड मात्र मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे. श्रीविद्यामहायोग परंपरेतील एक श्रेष्ठतम आचार्य श्रीनिवास बुध या मध्ययुगात होवून गेलेल्या दक्षिण भारतातील एक थोर विद्वान योग्यानी ज्ञानखंडावर संस्कृत मधून टीका लिहलेली आहे. महात्मखंड दुर्मिळ परंतु मुद्रित स्वरूपात कुठे कुठे उपलब्ध आहे.

भगवान श्री शंकराचार्य अर्थात् आदिशंकरभगवत्पाद
भगवान श्री शंकराचार्य अर्थात् आदिशंकरभगवत्पाद
प्राक्ऐतिहासिक कालात भगवान श्रीदक्षिणामूर्तिंनीपासून उगम पावलेली ही श्रीविद्यामहायोग परंपरा विद्यमान ऐतिहासिक कालात सनातन वैदिक धर्मोध्दारक भगवान श्रीमत् आदिशंकरभगवत्पाद यांच्यापर्यंत येवून पोहोचते. भगवान श्री शंकराचार्य अर्थात् आदिशंकरभगवत्पाद यांचे जीवनचरित्र सनातन वैदिक धर्माचे विद्यमान ऐतिहासिक कालातील एक महान उध्दारक म्हणून सर्वांना परिचित आहेच. इ.स. पूर्व पाचव्या शतकात केरळमधील ‘कालडी’ या गावी ब्रम्हश्री शिवगुरू आणि त्यांची पत्नी आर्यांबा या ब्राम्हण दांपत्याच्या पोटी भगवान परमशिव दक्षिणामूर्तीनीच पुत्ररूपाने जन्म घेतला. भगवान शिवाच्या प्रसादाने त्याचाच अंश म्हणून अवतीर्ण झालेल्या आपल्या मुलाचे नांवही ब्रम्हश्री शिवगुरूंनी ‘शंकर’ असेच ठेवले. हाच बालक आपल्या बत्तीस वर्षाच्या अवतारी जीवन कार्यामधून ‘आचार्य शंकर’ म्हणून प्रसिद्धीला आला. हा इतिहास सर्वश्रुत आहे. सनातन धर्म अवनतीच्या अवस्थेत आला असता त्याला पुन्हा उन्नतीच्या स्तरावर नेण्याचे महान कार्य भगवान श्री आदिशंकरभगवत्पादानी केले. उपनिषदे, महर्षि बादरायणरचित ब्रह्मसूत्रे आणि श्रीमद्भगवतगीता या वेदांताची प्रस्थानत्रयी म्हणून सर्वमान्य असणाऱ्या ग्रंथावर अत्यंत उद्बोधक भाष्ये लिहून आचार्य शंकरांनी सनातन वैदिक धर्माचा प्रासाद अद्वैतसिद्धांताच्या भक्क्म पायावर उभा केला. सनातनधर्माच्या परिघाबाहेरील व त्याचबरोबर सनातन धर्माच्या अतंर्गत असूनही सनातन धर्माच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधी आचार विचार प्रस्तूत करणाऱ्या प्रतिपक्षी विरोधकांबरोबर वादविवाद करून भगवान आदिशंकरभगवत्पादानी समस्त भारत वर्षात सनातन वैदिक धर्माला अनुकूल वातावरण तयार केले. समाजाचे धार्मिक, अध्यात्मिक नेतृत्व करणाऱ्या बुध्दिमान अभिजन वर्गाचे वरील प्रकारे उद्बोधन करण्यावरच आचार्य शंकर थांबले नाही तर सनातन धर्माच्या मूळ प्रवाहापासून बाहेर पडलेल्या बहुसंख्य श्रद्धाजीवी वर्गाला ‘पंचायतन’ ऊपासनेद्वारे श्रुतीस्मृती मूलक, पुराणोक्त, आगमोक्त धर्मसाधनेकडे वळवून त्या बहुजन वर्गालासुद्धा सनातन धर्माच्या मूळ प्रवाहात आणण्याचे महान कार्य भगवान आदिशंकरभगवत्पादानी केले.
उत्तरेत हिमालयात बदरीनारायणक्षेत्र, पूर्वेकडील जगन्नाथपुरी, दक्षिण भारतातील शृंगेरी आणि भारताच्या पश्चिम भागात गुजरातमधील द्वारकाक्षेत्री मठ स्थापना करून व त्यावर आपल्या प्रमुख चार शिष्यांना अधिष्ठित करून त्यांच्या शिष्योपशिष्याद्वारे सनातन धर्माच्या प्रचाराचे कार्य कालप्रवाहात अव्याहतपणे चालू रहावे अशी व्यवस्था आचार्य शंकरांनी केली. स्वत: आचार्य शंकरांनी चोल देशातील अर्थात विद्यमान तामिळनाडूमधील सप्तमोक्षपुरींपैकी एक मोक्षपुरी म्हणून विख्यात असलेल्या आणि भगवती श्रीलालितामहात्रिपुरसुंदरी, श्रीविद्याकामाक्षी देवीचे जागृत शक्तीपीठ असलेल्या कांचीपुरम् अथवा कांचीवरम् येथे मठ स्थापना करून त्या मठावर स्वत: आचार्य शंकरच पीठाधिपती म्हणून अधिष्ठित झाले. त्यांनी स्थापन केलेला हा मठच त्यांच्यापासून अविरतपणे गुरुशिष्य परंपरेने पीठाध्यक्षांच्या आसनावर अधिष्ठित झालेल्या अनेक विद्वान, तपस्वी, संन्यस्त जीवन जगणाऱ्या महायोगी पुरुषांनी स्वत:च्या अध्यात्मिक कर्तृत्वाने ‘कांचीकामकोटीपीठ’ म्हणून नावरुपाला आणला. आचार्य शंकरानी उभारलेल्या या मठसंस्थांद्वारे आजही सनातन वैदिक धर्माच्या प्रचार-प्रसाराचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. भगवान श्रीशंकराचार्यांनी अडीच हजार वर्षापूर्वी अवतार धारण करून सनातन वैदिक धर्माचे उद्धार करण्याचे लोकोत्तर कार्य केले. त्याचे साधारणपणे तीन पैलू दिसून येतात. “वेदोनित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयताम् |” हा संदेश देवून वेदाध्ययन आणि वेदमूलक कर्माचे आचरण याकडे समस्त सनातनधर्मीयांचे लक्ष वळविणे हा त्यांच्या सनातन धर्मोद्धाराचा महत्त्वाचा पैलू होता. परंतु त्याचबरोबर वेदाचे अंतीम तात्पर्य वर्णविहित कर्मच आजीवन करण्यामध्ये नसून कर्तुभोक्तृभावहीन परब्रम्हाशी ऐक्य अनुभवून नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होणे यातच जीवाची कृत्यकृत्यता आहे. याचे प्रतिपादन करण्यामध्येच समस्त वेदावेदांताचे अंतीम तात्पर्य आहे, असा सिद्धांत मांडून केवळ बाह्याचाररत असलेल्या वैदिक समाजामध्ये त्यांनी अव्दैतज्ञानमार्गाची जी प्रतिष्ठा केली तो त्यांचा अवतारी धर्मकार्याचा दुसरा पैलू होता. परंतु त्याचबरोबर आपण हे ही आवर्जुन लक्षात घेतले पाहिजे की, त्यांनी केलेल्या धर्मकार्याचा तितकाच महत्त्वाचा असलेला एक तिसरा पैलू सुध्दा होता की ज्याच्या अस्तित्वाची अजूनपर्यंत फारशी दखल घेतली गेलेली नाही. तो तिसरा पैलू म्हणजे त्यांनी केलेल्या श्रीविद्याअखंडमहायोग साधनप्रणालीचा पुनरुद्धार हा होय. श्रीमत् आचार्य शंकरानी केलेल्या धर्मकार्याच्या वरील तिसऱ्या पैलूचे महत्व आपण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट खरी की, श्रीमद्चार्यांनी ‘वेदोनित्यमधीयताम्’ असा आदेश वैदिकांना देवून वैदिकांना वेदाध्ययनाकडे व वेदमूलक कर्म करण्याकडे वळविले. त्यांच्या या कर्मामुळे जैन-बौद्धांच्या प्रभावाखाली सापडून समाजातील जो बुध्दीमान अभिजनवर्ग सनातन धर्माचे मूळ असलेल्या वेदांच्या अध्ययनाला विमुख झालेला होता तो पुन्हा श्रद्धेने वेदाध्ययनाकाडे आणि वैदिक पद्धतीला अनुसरून जगण्याकडे प्रवृत्त होवू लागला. परंतु मुळातच हा वर्ग संख्येने मर्यादित होता. कारण वैदिक परंपरेला अनुसरून वेदाध्ययन करण्यासाठी आणि वेदमूलक वर्णविहीत कर्म करण्याचा अधिकार ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णातील उपनयन संस्कार झालेल्या पुरुषांनाच होता. वरील तिन्ही वर्णातील स्त्रिया आणि चौथ्या वर्णातील सर्व शूद्र स्त्री-पुरुष हे वेदाध्ययन व वेदमूलक कर्माचे आचरण या दोन्ही गोष्टी करू शकत नव्हते. उपनिषद् अथवा वेदांताचे अध्ययन फक्त अव्दैतज्ञानेच्छुक व मोक्षार्थी असलेल्या संन्याश्यांपुरतेच मर्यादित होते. याचा अर्थ असा की, वेद आणि वेदांत या दोन्हीवर आधारलेल्या साधनापद्धती सनातनधर्मीय समाजातील पहिल्या तीनही वर्णातील गृहस्थाश्रमी पुरुष व त्यांच्यामधूनच विहित कर्म त्याग करून पुढे आलेल्या व संन्यस्त जीवन जगणाऱ्या ‘यती’ वर्गापुरताच मर्यादित होत्या. या सर्व साधनापद्धतींमध्ये ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णातील स्त्रिया व शूद्रवर्णातील स्त्री पुरुषांना प्रवेश नव्हता. यामुळे समाजातील एक बहुसंख्य वर्ग वेदमूलक साधनांचे साक्षात अनुसरण करू शकत नव्हता. अशा काळात भगवत् आद्य शंकराचार्यांनी श्रीविद्याअखंडमहायोगासारखी वेदमूलक असलेली आणि स्मृती, पुराणे व तंत्रागम यांच्यामधून परिपुष्ट झालेली एक श्रेष्ठतम साधना सर्व वर्ण व आश्रमातील स्त्री-पुरुषांना त्या साधनेचा अधिकार देवून उपलब्ध करून दिली. हा श्रीमत् आद्यशंकरचार्यांच्या सनातन धर्मोद्धाराचा एक अत्यंत महत्वाचा पैलू होता की ज्याच्याकडे सनातन धर्माच्या इतिहासाच्या अभ्यासंकाचे व खुद्द सनातन धर्मियांचे फारसे लक्ष गेलेले नाही. भगवान श्री आदिशंकराचार्य सर्व वर्ण आश्रमातील स्त्री-पुरुषांना श्रीविद्यामहायोगात प्रवेश देऊन थांबले नाहीत तर त्यांनी काळातील आसेतुहिमाचलात पसरलेल्या व सिंधूसौविरादि कामरूप असम पर्यंत विस्तारलेल्या संपूर्ण भारतवर्षातील तत्कालीन समाजामध्ये ही साधनपद्धती श्रद्धेने अनुसरली जावी या हेतूने श्रीविद्याअखंडमहायोगाचा उपदेश करणाऱ्या धर्मपीठांची व त्या पीठांद्वारे उपदेशाचे कार्य करणाऱ्या उपदेशक अचार्यागुरुंची एक सक्षम यंत्रणाच उभी केली. श्रीमत् आद्यशंकरभगवत्पादांनी उभ्या केलेल्या या सर्व कार्याचा विस्तृत वृतांत श्रीमत् आद्यशंकराचार्यांच्या शिष्यपरंपरेमध्ये होवून गेलेल्या श्रीमत्विद्यारण्ययती यांनी रचलेल्या ‘श्रीविद्यार्णवतंत्र’ या ग्रंथामध्ये दिलेला आहे. ‘श्रीविद्यार्णवतंत्र’ हा श्रीविद्यामहायोग साधनपध्दतीचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक स्वरूप स्पष्ट करणारा एक अत्यंत प्रौढ व विद्वद्मान्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखक श्री विद्यारण्ययती हे होत. आधुनिक ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या इतिहास तज्ञांनी केलेल्या अनुमानानुसार हे विद्यारण्ययती इसवी सणाच्या अकराव्या शतकात होवून गेले असावेत. त्यांनी रचलेत्या ‘श्रीविद्यार्णवतंत्र’ मध्येच त्यांच्या काळात कान्यकुब्ज प्रदेशात म्हणजेच सध्याच्या उत्तरप्रदेशातील कनौज नगरच्या परिसरात प्रचलित असलेल्या कनौजी हिंदी भाषेतील कांही शब्दांचा उल्लेख येतो. उदाहरणार्थ, लाकूड जाळून शांत झाल्यानंतर त्याचे जे काळे कोळसे तयार होतात त्याला कान्यकुब्ज भाषेत ‘कोयला’ म्हणतात. असा उल्लेख श्री विद्यारण्ययतीच्या श्रीविद्यार्णवतंत्राध्ये एके ठिकाणी येतो. यावरून हे यती उत्तर भारतातील सध्याच्या उत्तरप्रदेशातील असावेत असे अनुमान करता येते.
वेद, स्मृती, पुराणे आणि आगम या सनातन धर्माच्या पायामधून असणाऱ्या समस्त अध्यात्मिक वाङमयाचे अत्यंत सखोल व विस्तृत अध्ययन केलेले हे एक विद्वान तपस्वी यती होते याची कल्पना त्यांनी रचलेल्या श्रीविद्यार्णवतंत्र या ग्रंथावरून येते. भगवत्पाद श्री आद्यशंकराचार्यांनी प्रवर्तित केलेल्या श्रीविद्यामहायोगपरंपरेतील हे एक सुश्रेष्ठ आचार्य होते. श्रीविद्यामहायोगाची प्रात्यक्षिक साधना करणाऱ्या साधकांना त्यांनी रचलेल्या श्रीविद्यार्णवतंत्राचा अतीव उपयोग होतो हे तर खरे आहेच; परंतु त्याचबरोबर श्रीविद्याअखंडमहायोगाच्या ऐतिहासिक विकासाचा कालक्रम समजून घेवू इच्छिणाऱ्या धर्मेतिहासाच्या अभ्यासकांच्या दृष्टीनेसुद्धा श्री विद्यारण्ययतींनी रचलेल्या श्रीविद्यार्णवतंत्राचे विशेष महत्व आहेच. कारण आपण वर म्हटल्याप्रमाणे श्रीमत् आद्यशंकराचार्यांनी आसेतुहिमाचलात श्रीविद्यासाधनेचा प्रचार करण्यासाठी आपल्या उपदेशक शिष्यांची एक यंत्रणा कशी पध्दतशीरपणे उभी केली आणि राबविली याचा अगदी स्पष्ट व विस्तृत वृतांत श्रीविद्यारण्यतींच्या श्रीविद्यार्णवतंत्र या ग्रंथामध्येच उपलब्ध होतो. वरील ग्रंथाच्या प्रारंभिक अध्यायामध्येच श्रीविद्यारण्ययतींनी लिहिले आहे की, भगवान श्री आद्य शंकराचार्यांनी श्रीविद्यामहायोग साधनेचे उपदेष्टे आचार्य म्हणून त्यांचे एकंदर चौदा शिष्य तयार केले होते. त्यातील पाच शिष्य संन्यासी होते तर नऊ शिष्य गृहस्थाश्रमी होते. शंकर, पद्मपाद, बोध, गीर्वाण आणि आनंदतीर्थ हे पाच संन्यासी उपदेष्टे आचार्य होते तर सुंदर, विष्णुशर्मा, लक्ष्मण, मल्लिकार्जुन, त्रिविक्रम, श्रीधर, कपर्दी, केशव आणि दामोदर हे नऊ गृहस्थाश्रमी आचार्य होते. श्रीमत् आद्यशंकर भगवत्पादांनी सनातन धर्माचा प्रचार-प्रसारासाठी ज्या मठ व पीठोपपीठांची स्थापना केलेली होती, त्या मठपीठादि धर्मसंथाच्या प्रमुखपदी जे आचार्य अधिष्ठित होत असत त्यांना श्रीविद्यामहायोगाची दीक्षा देवून त्यांच्याद्वारे त्या त्या मठपीठादि संस्थामधून अखंड गुरुशिष्यपरंपरेने श्रीविद्यामहायोगाची साधना अव्याहतपणे प्रवर्तित होत रहावी, या हेतूने शंकरपद्मपादादि पाच संन्यासी, आचार्यांची नियुक्ती श्रीमत् आद्य शंकरभगवत्पादांनी केलेली होती. विविध शांकरपीठांमधून जे संन्यासी, आचार्य पीठाधिपती नियुक्त होत असत त्यांना श्रीविद्यामाहायोगाची दीक्षा देणे व त्यांच्याद्वारे त्यांच्या त्यांच्या पीठांमधून श्रीविद्यामहायोगाची साधना प्रचलित ठेवणे हे शंकरपद्मपादादी पाच संन्यासी आचार्यांचे काम होते. सुंदर, विष्णूशर्मादि नऊ गृहस्थाश्रमी आचार्यांकडे सुद्धा हेच काम होते. त्यांनी श्रीविद्यामाहायोग साधनेची परंपरा सर्वसामान्य गृहस्थाश्रमी साधकांमध्ये उपदेश व मार्गदर्शनाद्वारे प्रचलित ठेवावी, हा या नऊ गृहस्थाश्रमी उपदेष्टे आचार्यांच्या नियुक्तीमागचा हेतू होता. सारांश, आपल्या सर्वच संन्यासी व गृहस्थाश्रमी अनुयायांमध्ये श्रीविद्यामाहायोगसाधना सतत प्रवर्तित होत रहावी या हेतूने श्रीमत् आदिशंकरभगवत्पादांनी आपले वर उल्लेखिलेले चौदा शिष्य निर्माण केले व त्यांच्याद्वारे आसेतू हिमाचलात आपल्या पीठोपपीठांच्या माध्यमातून श्रीविद्यामाहायोगाची साधना प्रचारित, प्रसारित होत रहावी अशी एक अत्यंत सक्षम यंत्रणा उभी केली. श्रीमत् आदिशंकरभगवत्पाद अद्वैत वेदांताष्ठित ज्ञानमार्गाचे सुश्रेष्ठ परमाचार्य म्हणून सुप्रसिद्ध आहेतच. दशोपनिषदे, श्री बादरायण रचित शारीरक सूत्र अथवा ब्रह्मसूत्र आणि श्रीमद्भगवतगीता या वेदांताच्या प्रस्थानत्रयीवर अद्वैती दृष्टीकोनातून त्यांनी लिहलेली भाष्ये ही विद्वद्जनांच्या अतीव आदराचे विषय आहेत ही गोष्ट सर्वश्रुत आहे. वेदादिशास्त्रांमध्ये आणि बौद्धादि अवैदिक शास्त्रांमध्येसुद्धा सखोल अवगाहन केलेले एक विद्वान ज्ञानी महापुरुष ही श्रीमत् शंकरभगवत् पादांची ख्याती सर्वमान्य आहे, यात संशय नाही. परंतु श्रीमत् शंकरभगवत्पादांच्या व्यक्तिमत्वाच्या या दैदीप्यमान बाजुकडेच लक्ष ओढले गेले असल्यामुळे म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे म्हणा श्रीमत् शंकरभगवत्पादांच्या बहुआयामी आणि उत्तुंग अशा अध्यात्मिक विभूतिमत्वाच्या इतरही तितक्याच महत्वाच्या बाजूंकडे दुर्लक्ष होणे शक्य आहे. त्यातीलच एक अत्यंत महत्वाची बाजू म्हणजे श्रीमत् शंकरभगवत्पाद हे केवळ निर्गुण निराकार ब्रम्हद्वैताचे पुरस्कर्ते असलेले ज्ञानमार्गी सिद्धपुरुषच होते असे नसून ते सच्चिदानंद परब्रम्हपरमात्मस्वरूप, भगवंताची विविध देवी-देवतांच्या रुपामधून उपासना करणारे प्रेमळ भक्त आणि पारमेश्वरी चीत्शक्तीशी श्रीविद्याअखंडमहायोगाद्वारे सामरस्य अनुभविलेले उच्चकोटीचे महायोगी पुरुषही होते. भगवान श्रीमत् आदिशंकरभगवत्पादांना वेदांताधिष्ठित ज्ञानसाधनेबरोबरच श्रीविद्यामहायोगसाधनेचा उपदेशही त्यांचे गुरुदेव श्रीगोविंदपाद यांच्याकडून प्राप्त झाला. श्रीमत् गोविंदपाद हे मध्यप्रदेशातील नर्मदेचा उगम असलेल्या अमरकंटक या क्षेत्रामध्ये निवास करणारे महान योगीपुरुष होते. केरळमधील ‘कालडी’ हे आपले जन्माग्र सोडून उत्तर दिशेने निघालेल्या कुमारवयातील शंकराची अमरकंटक येथे श्रीमत् गोविंदपादयतिबरोबर भेट झाली व त्यांच्याकडूनच अनुग्रहसुद्धा प्राप्त झाला. भगवान श्री गोविंदपादयति हे थोर योगी पुरुष होते. श्रीविद्यामाहायोग परंपरेत प्रचलित असलेल्या अनुश्रुतीवरून असेही समजते की, श्रीविद्याअखंड महायोगाची एक अत्यंत कठीण व गुह्य मानली जाणारी ‘कायासिद्धीयोग’ या साधनेमध्ये भगवान श्री गोविंदपादयतींनी पूर्णता प्राप्त करून घेतलेली होती. आपल्या स्थूल देहाचे अजर, अमर दिव्य चिन्मय देहात रुपांतर करून श्री गोविंदपादयती सर्वभक्षक कालावरही विजय मिळवून पृथ्वीवर आजही सदेह विद्यमान आहेत. श्रीविद्यामहायोग पद्धतीने साधना करणाऱ्या भाग्यवान साधकांना त्यांचे दर्शनही प्राप्त झालेले आहे असेही उल्लेख आढळतात. स्वामी स्वात्माराम योगेंद्र यांनी लिहिलेल्या ‘हटयोग प्रदीपिका’ या ग्रंथामध्ये कालवंचन करून स्वतःचा भौतिक देह अजर अमर बनविलेल्या ज्या विद्यमान महायोगी पुरुषांची नावे आलेली आहेत त्यामध्ये श्रीमत् गोविंदपादयतींचे नावही समाविष्ट आहे. खुद्द श्री गोविंदपादयतींना श्रीविद्यामहायोग साधनेचा उपदेश त्यांचे गुरुदेव भगवत् श्री गौडपाद त्यांच्याकडून होता.
भगवान श्री गौडपाद हे अद्वैत वेदांत परंपरेतील एक सुश्रेष्ठ आचार्य म्हणून विद्वद्समाजामध्ये ज्ञात आहेत. मांडुक्यउपनिषदावर त्यांनी लिहिलेल्या ‘गौडपादकारिका’ हा ग्रंथ अद्वैत वेदांतातील अजातवादाचे प्रतिपादन करणारा एक अत्यंत उच्चकोटीचा सूक्ष्मविचारपरिप्लुप्त असा महान ग्रंथ आहे. परंतु हि गोष्ट फारच थोडया लोकांना माहित असावी की, श्रीमत् भगवत् गौडपाद हे एक थोर श्रीविद्यामहायोगी पण होते. श्रीविद्यासाधनक्रमाचे सूत्रमय भाषेमध्ये प्रतिपादन करणारा ‘श्रीविद्यारत्नसूत्र’ हा ग्रंथ श्रीमत् भगवान गौडपादांनीच रचलेला आहे. श्रीमत् शंकराचार्याच्या अनेक भाष्यग्रंथावर टीका लिहिणाऱ्या स्वामी श्रीमत् शंकरनंदानी श्रीविद्यारत्नसूत्रांवरसुद्धा एक संक्षिप्त व्याख्या लिहलेली आहे. ‘सुभगोदयस्तुती’ हा चित्शक्ती ललितामहात्रिपुरसुंदरी देवीचे स्तवन करणारा स्तोत्रग्रंथसुद्धा भगवान गौडपादांनी रचलेला आहे. सुभगोदयस्तुतीमध्ये प्रतिपादन केलेला ‘समयमत’ या श्रीविद्यामहायोग साधनक्रमातील एक विशेष साधनप्रकाराला केंद्रीभूत ठेवूनच श्रीमत् आदि शंकरभगवत् पादांनी ‘सौंदर्यलहरी’ हे श्रीदेवीस्तुतीपर स्तोत्र रचले. अंदाजे शंभर श्लोक असलेला हा सौंदर्यलहरी ग्रंथ श्रीविद्यामहायोग साधन परंपरेतील एक अत्यंत प्रमाणभूत असा ग्रंथ आहे. चित्शक्तीचे निर्गुण निराकार चैतन्यस्वरूप अर्थात परस्वरूप, तिचे सगुण निराकार मंत्रमय परापर स्वरूप आणि लोकोत्तर सौंदर्यांनी परिपूर्ण असे चिन्मय सगुण साकार मूर्त असे अपरस्वरुप या चित्शक्तीच्या तीनही स्वरूपांचे स्तुतीरुपाने वर्णन करण्याच्या निमित्ताने भगवान श्री आदिशंकरभगवत्पादांनी श्रीविद्यामहायोग साधनेतील अनेक गुह्यतत्वांवर आणि गुह्य साधनप्रकारांवर सौंदर्यलहरीमधून प्रकाश टाकलेला आहे. मराठी, हिंदी इत्यादि प्राकृत भाषा सोडल्या तर केवळ संस्कृतमधूनच लिहिलेल्या सौंदर्यलहरीवरील जवळ-जवळ चाळीसहून अधिक टीका उपलब्ध आहेत. यावरूनच विद्वद्जनांमध्ये व साधकसमूहामध्ये हे सौंदर्यलहरी स्तोत्र कसा अतीव आदराचा आणि गंभीर अभ्यासाचा विषय बनलेला आहे याची कल्पना येते. ‘अद्वैतमकरंद’कार लक्ष्मीधर या अद्वैत परंपरेतीलच श्रोत्रीय, ब्रम्हनिष्ठ ज्ञानयोगी सत्पुरुषांनी सौंदर्यलहरीवर लिहिलेली ‘लक्ष्मीधरी’ ही टीका वरील सर्व टीकांमध्ये मुकुटमणी म्हणून शोभावी. महायोगी श्री लक्ष्मीधराचार्यांनी आपल्या या ‘लक्ष्मीधरी’ टीकेच्या माध्यमातून सौंदर्यलहरी स्तोत्रामधून प्रतिपादन केलेल्या श्रीविद्यामहायोग साधनक्रमातील अनेक सैद्धांतिक व साधनात्मक बाबींवर अत्यंत सुस्पष्ट प्रकाश टाकलेला आहे. ब्रम्हांडपुराणामध्ये आलेले ‘ललितात्रिशतीस्तोत्र’ यावरही आदिशंकरभगवत्पादांनी भाष्य लिहून त्याद्वारे श्रीविद्यामहायोग साधनक्रमातील अनेक रहस्यमय तत्वांवर प्रकाश टाकलेला आहे. ‘प्रपंचसारसंग्रह’ हा त्यांनीच रचलेला ग्रंथ श्रीविद्या आणि तदनुषांगिक योगसाधना यावर प्रकाश टाकणारा आणखी एक ग्रंथ असून त्यावर श्रीमदाचार्यांचे शिष्योत्तम श्रीमत् पद्मपादाचार्य यांनी लिहलेली टीकाही उपलब्ध आहे. ‘प्रपंचसारसंग्रह’ व त्यावरील श्रीपद्मपादांची टीका या दोन्हीवरून श्रीविद्यासाधनक्रमाशी संबंधीत असलेल्या अनेक रहस्यमय सैद्धांतिक व साधनात्मक बाबींवर प्रकाश टाकला गेलेला आहे. भगवान आदिगुरु परमगुरु श्रीदक्षिणामूर्ती यांच्या दिव्य प्रज्ञेतून उगम पावलेली भगवान दत्तात्रेय, भगवान परशुराम, भगवान अगस्त्य, भगवान हयग्रीव, भगवान श्रीआनंदभैरव नटेश्वर, भगवान श्रीदुर्वास, श्रीमन् महर्षि सुमेधा हारितायन यासारख्या अनेक दिव्य व सिद्ध महर्षिंच्या लोकोत्तर तपस्याभूमीमधून प्रवाहित झालेली हि श्रीविद्यामहायोग साधनपरंपरेची भागीरथी आधुनिक ऐतिहासिक काळात भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्तीचेच अवतार असलेल्या श्रीमत् आदिशंकर भगवत्पदांनी सनातनधर्म भूमी असलेल्या भारतवर्षात आसेतुहिमाचल कशी प्रवाहित केली याची थोडीफार कल्पना वरील विवेचनावरून येईल. अद्वैतवेदांताधिष्ठित ज्ञानमार्गाबरोबरच श्रीविद्याअखंडमहायोग साधनक्रमातील एक सुश्रेष्ठ परमाचार्य म्हणून श्रीमत् आदिशंकर भगवत्पादाचे नाव सनातन धर्माच्या इतिहासामध्ये ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ झळकत राहील यात शंका नाही. श्रीविद्यामहायोगाच्या प्रचारासाठी श्रीमत् आदिशंकरभगवत्पादांनी प्रतिष्ठित केलेल्या चौदा शिष्यांपैकी नऊ शिष्यांतर्गत महायोगी श्रीविष्णूशर्मा यांच्या परंपरेमध्येच साधारणपणे सतराव्या ख्रिस्ती शतकाच्या शेवटी आणि अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात एक थोर अधिकारसंपन्न श्रीविद्यामहायोगी अवतीर्ण झाले. ते म्हणजे श्रीमत् भास्करराय भारती हे होत.

श्रीमत् भास्करराय भारती भासुरानंदनाथ
श्रीमत् भास्करराय भारती भासुरानंदनाथ
भास्कररायभारती हे विश्वामित्र गोत्राचे महाराष्ट्रीय देशस्थ ब्राम्हण होते. गंभीरराय आणि त्यांची पत्नी कोणमांबा यांच्या पोटी जन्म घेतलेल्या भास्कररायांनी आपल्या नावांप्रमाणेच आपल्या भास्कर अर्थात सूर्यसदृश्य उज्ज्वल बुद्धीमत्तेचा परिचय अगदी बालपणापासूनच देण्यास सुरुवात केली. भास्कररायांचे वडील गंभीरराय विजापूरच्या तत्कालीन बहामनी राजा आदिलशहाच्या पदरी पंडीत म्हणून कार्य करत असत. आदिलशहाच्या आज्ञेवरून त्यांनी संपूर्ण महाभारताचे फारसी भाषेमध्ये भाषांतर केले. त्यामुळे प्रसन्न होवून राजा आदिलशहाने गंभीररायांना ‘भारती’ ही पदवी दिली. बालभास्कररायांना त्यांचे वडील गंभीरराय यांनी प्रारंभिक वेदाध्ययनामध्ये धडे दिले. भास्कररायांचे आठव्या वर्षी मौजीबंधन करून त्यांना स्वतः गंभीररायांनी मेधासरस्वती मंत्रामध्ये दीक्षित केले. भगवती श्रीसरस्वतीमातेच्या कृपेने बालभास्कररायांच्या बुद्धीत प्रज्ञा, मेधा व प्रतिभा अशा ज्ञानशक्तीच्या तीनही आविष्कारांचे प्रकटीकरण अगदी बालवयामध्येच होवून वेदादि चौदा विद्याप्रस्थानांमध्ये भास्कररायांनी प्राविण्य मिळविले. तारुण्यामध्ये प्रवेश केलेल्या भास्कररायांना शास्त्रीय ग्रंथाच्या अध्ययनाबरोबरच योग, उपासना यासारख्या गुह्य साधनांमध्ये मार्गदर्शन करणारे दुसरे एक थोर तपस्वी गुरु लाभले. त्यांचे नांव नृसिंहाध्वरी असे होते. अगदी अल्पावधीत भास्कररायांची किर्ती त्या काळातील सर्वश्रेष्ठ विद्याक्षेत्र असलेल्या वाराणसीपर्यंत पोहचली. अध्ययन, अध्यापन आणि धर्मप्रचार करण्याच्या निमित्ताने आसेतु हिमाचलात प्रवास करणाऱ्या भास्कररायांची गुजरातमधील सुरत येथे राहणाऱ्या श्रीमान शिवदत्त शुक्ल यांच्याशी भेट झाली. श्रीमान शिवदत्त शुक्ल हे आचार्य विष्णुशर्मा यांच्या परंपरेतील एक थोर महायोगी होते. प्रकाशानंदनाथ हे त्यांचे दीक्षानाम होते. श्री शिवरत्न शुक्ल उपाख्य प्रकाशानंदनाथांनी श्रीमान भास्कररायांना श्रीविद्यामहायोगामध्ये सपत्नीक दीक्षित केले. दीक्षेनंतर भास्कररायांना भासुरानंदनाथ व त्यांच्या पत्नीस पद्मावत्यंबिका असे दीक्षानामानिधान प्राप्त झाले. भगवती पद्मावत्यंबिका यांनी श्रीमत् भास्कररायांच्या बरोबरीने श्रीविद्यामहायोग साधन करून महायोगीनीपद प्राप्त करून तर घेतलेच परंतु त्यांच्या बरोबरीने त्यांच्या धर्मकार्यात सहभागी होवून भास्करराय करीत असलेल्या धर्मप्रचार कार्यामध्येसुद्धा क्रियाशील सहभाग नोंदविला.
एक महान विद्वान, ज्ञानी आणि महायोगी पुरुष म्हणून श्रीमत् भास्कररायांची किर्ती आसेतु हिमाचलात वास करणाऱ्या विद्वद्जनांमध्ये पसरू लागली. त्यांची विद्वता आणि विभूतीमत्व याने प्रभावित होवून दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये असणाऱ्या तंजौरमध्ये राज्य करणाऱ्या व्यंकोजी भोसले या मराठा राजाने भास्कररायांना आपल्या दरबारी मोठ्या आदराने बोलविले व त्यांना राजपंडीताचा बहुमान दिला. हे राजे व्यंकोजी भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे वडील शहाजी भोसले यांचे पुत्र होत. व्यंकोजी राजांनी भास्कररायांना कावेरी नदीच्या उत्तर तीरावर असणारे एक गांव अग्रहार म्हणून दिले व त्या गावाला ‘भास्करराजपुरम’ असे नांव दिले. भास्कररायांनी त्या गावी पाठशाला स्थापन करून वेद, आगम इ. शास्त्रांच्या अध्यापनाबरोबरच श्रीविद्यामहायोगा सारख्या गूढ विद्यांचा अधिकारीजनांमध्ये प्रचार करण्याचे कार्य आजीवन केले. आदिशंकर भगवत् पादांप्रमाणेच श्रीमत् भास्कररायांनीसुद्धा उत्तरेतील बदरीपासून, दक्षिणेतील रामेश्वरपर्यंत आणि पश्चिमेकडील द्वारकेपासून पूर्वेकडील कामरूप आसामपर्यंत अनेक वेळेला पदयात्रा करून सनातनधर्मी जनतेमध्ये वेद, पुराणे, आगम, मंत्रशास्त्र इ. तत्कालीन धर्म जीवनाचे आधार असलेल्या विद्याप्रस्थानांमध्ये रुची उत्पन्न करण्याचा अथक प्रयत्न केला. स्वतः भास्कररायांनी जवळ-जवळ चाळीसहून अधिक ग्रंथ लिहले. त्यातील काही छापील स्वरुपात तर काही हस्तलिखीत स्वरुपात आजही उपलब्ध आहेत. वेद, वेदांत, धर्मशास्त्र, न्याय, व्याकरण, अलंकार, छंदशास्त्र, मंत्रशास्त्र अशा अनेकविध विषयांशी संबंधीत सखोल ग्रंथ रचना करून श्रीमान भास्कररायांनी आपल्या महापांडित्याचा तत्कालीन विद्वद्जनासमोर एक आदर्श मानदंड प्रस्थापित केला. ब्रम्हांड पुराणांतर्गत ललितासहस्त्रनामावर त्यांनी लिहिलेले संस्कृत भाष्य हे श्रीविद्यामहायोग साधनेमधील अनेक गूढ तत्वांवर सुस्पष्ट प्रकाश टाकणारी एक महान वाङमयीन कृती होय. ‘वामकेश्वतंत्रा’वर त्यांनी लिहलेली ‘सेतुबंध’ ही टीका त्यांच्या तांत्रीक आगमामधील असणाऱ्या अतुलनीय पांडित्याचा परिचय करून देते. ‘वरिवस्यारहस्य’ हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ श्रीविद्यामहायोग साधनेतील अनेक गुह्य अंतरंगप्रक्रियांचे स्पष्टीकरण करणारा एक अजोड ग्रंथ म्हणावा लागेल. आपल्या या स्वत:च्या ग्रंथावर त्यांनी स्वतः ‘प्रकाश’ नावाची व्याख्या लिहिली आहे. वरिवस्यारहस्य व वरिवस्याप्रकाश या दोन्हीमधून श्रीविद्यामहायोगसाधनेच्या अंतर्गत असलेल्या अनेक गुह्य व दुर्मिळ ध्यान प्रक्रियांचे स्पष्टीकरण उपलब्ध होते. श्रीमान् भास्कररायांनी व्यक्तीगत साधनात्मक तपस्या, विद्याध्ययन व अध्यापन याद्वारे एका आदर्श गृहस्थाश्रमी महायोग्याचा मानदंड समाजासमोर ठेवलाच; परंतु त्याचबरोबर श्रीविद्यामहायोगासारख्या एक गुह्य योगप्रक्रियेला त्यावेळेच्या राजेमहाराजांपासून समाजाच्या अगदी तळागाळापर्यंत पसरलेल्या सामान्यजनांपर्यंत पोहचविण्यासाठी स्वतः आणि आपल्या शिष्योपशिष्यांच्याद्वारे अखंड प्रयास केले. भास्कररायांचे संस्कृतमधून चरित्र लिहलेले त्यांचे शिष्योत्तम श्रीमान जगन्नाथ पंडीत उर्फ उमानंदनाथ यांनी त्यांच्या चरित्र कथनाच्या ओघात असे म्हंटले आहे की, संपूर्ण दक्षिण भारतामध्ये असा एक ही राजा, संस्थानिक, जहागीरदार नव्हता की जो श्रीमत् भास्कररायांकडून श्रीविद्यामहायोगामध्ये दीक्षित झालेला नव्हता. पूज्यश्री उमानंद नाथांचा असा अभिप्राय दिसतो की, दक्षिण भारतातील त्याकाळातील बहुतेक सर्वच राजे, महाराजे, श्रीमत् भास्कररायांचे दीक्षित शिष्य बनलेले होते. यामधून त्यावेळच्या राजकीय नेतृत्वावर पडलेला श्रीमत् भास्कररायांच्या अध्यात्मिक विभूतीमत्वाचा प्रभाव तर दिसून येतोच परंतु त्याच बरोबर या प्रभावाचे तात्कालीन हिंदू समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक भवितव्यावर किती दूरगामी प्रभाव पडले याचीसुद्धा नोंद घेणे उद्बोधक ठरेल. भास्कररायांच्या काळात मुस्लीम धर्म आणि संस्कृती यांचा प्रभाव बहुसंख्य हिंदू मानसामध्ये रुजविण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या मुस्लीमधर्मीय शासकाकडून व त्या शासकांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हात मिळवणी करून त्याच दिशेने प्रयत्न करणाऱ्या मुस्लिमधर्मीय सुफी संताकडून मोठया आग्रहाने सुरु होता. तथाकथित उच्चवर्णीय वर्गातील व्यक्तीपासून अगदी तळागाळातील समाजापर्यंत हा मुस्लिम धर्म व संस्कृतीचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात दिसू लागलेला होताच. अशा या काळात श्रीमत् भास्कररायांनी तपस्या, विद्वता, अमोघ सिद्धीसामर्थ्य त्या तिहींद्वारे तत्कालीन हिंदू राज्यकर्त्यांना प्रभावित करून त्यांना सनातन वैदिक हिंदू धर्माचे एक अत्यंत व्यापक अंग असलेल्या श्रीविद्यामहायोगाच्या आश्रयाखाली आणले. त्यामुळे ते बहुसंख्य हिंदू राज्यकर्ते सनातन धर्माच्या प्रभावाखाली राहिले. ‘यथा राजा तथा प्रजा’ या नात्याने त्या-त्या राज्यकर्त्यांच्या नियंत्रणाखाली असलेली प्रजासुद्धा हिंदू धर्म व संस्कृतीच्या प्रभावाखाली राहिली व त्यामुळेच हिंदू समाजातील एक मोठा बहुसंख्य वर्ग परधर्मीय होण्यापासून बचावला. सनातन हिंदू धर्म आणि संस्कृतीचा प्रभाव दक्षिण भारतीय समाज मानसामध्ये रुजवून स्थिर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या ज्या कांही थोर विभूती गेल्या कांही शतकामध्ये दक्षिण भारतामध्ये होवून गेल्या त्यामध्ये चौदाव्या, पंधराव्या शतकात विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करणाऱ्या हरिहर आणि बुक्कराय व त्यांचे मार्गदर्शक, प्रेरक गुरु असलेले श्रीमत् माधवाचार्य विद्यारण्यस्वामी यांच्या बरोबरीनेच श्रीमत् भास्कररायांचे नांव सुद्धा अग्रक्रमाने नोंदवले जाईल.

भगवान श्री शिवचिदंबर महास्वामी
भगवान श्री शिवचिदंबर महास्वामी
श्रीमत् भास्कररायांकडून श्रीविद्यामहायोगात दीक्षित झालेल्या अनेक थोर सत्पुरुषांपैकीच श्रीमत् स्वयंप्रकाशस्वामी हे एक होत. श्रीमत् स्वयंप्रकाशस्वामी हे एक थोर चतुर्थाश्रमी अर्थात् संन्यासी योगी पुरुष होते. आपल्या संन्यस्त जीवनाचा बहुतेक काळ वाराणसीक्षेत्री व्यतीत करणाऱ्या श्रीमत् स्वयंप्रकाशयतींनी वाराणसीमध्ये श्रीमत् भास्कररायांकडून श्रीविद्यामहायोगाची दीक्षा घेतली. महायोगक्रमामधून क्रमश: साधना करीत करीत साधनसिद्धस्थिती प्राप्त करून घेणाऱ्या स्वामी स्वयंप्रकाशयतींनी वाराणसीक्षेत्री राहून अनेक जनांना श्रीविद्यामहायोगाद्वारे समग्र कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांच्या अनुग्रहास पात्र झालेल्या अनेक अधिकारी जनांपैकीच मार्तंड दीक्षित हे एक सत्पुरुष होत. मार्तंड दीक्षित हे मुळचे कर्नाटकातील गोठे या गावचे रहिवासी होते. त्यांच्या घराण्यात ग्रामजोशीपणाची वृत्ती(व्यवसाय) होती. ऐन तारुण्यात वैराग्य प्राप्त झाल्याने कांही आत्मकल्याण साधावे या हेतूने श्रीमत् मार्तंड दीक्षित हे वाराणसी क्षेत्री येवून राहिले असता त्यांची श्रीमत् स्वामी स्वयंप्रकाशयतींशी भेट झाली. मार्तंड दिक्षितींच्या पारमार्थिक अधिकाराची परीक्षा घेवून त्यात ते उत्तीर्ण झाल्याचे दिसल्यावर मार्तंड दिक्षितींना स्वयंप्रकाशयतींनी श्रीविद्यामहायोगात दीक्षित केले. त्यानंतर क्वचित काळ वाराणसी क्षेत्री राहून श्रीगुरुदेव स्वयंप्रकाश यांच्या आज्ञेनुसार मार्तंड दीक्षित दक्षिणेत परत आले व आपल्या गोठे या कर्नाटकातील गांवी येवून राहिले. सौ. लक्ष्मीबाई या आपल्या पत्नीबरोबर संसारी, गृहस्थाश्रमी धर्म अवलंबणाऱ्या मार्तंड दीक्षितांनी कालांतराने गोठे हे आपले ग्राम सोडून मुरगोड या गावी वास केला. त्या गावामध्ये अग्निहोत्र व पाठशाळा स्थापन करून श्रीमान मार्तंड दीक्षित हे वेदाध्ययन, अध्यापनरत असे तपस्वी जीवन जगू लागले. तत्कालीन धर्मग्लानी, राज्यकर्त्यादि वरिष्ठ वर्गातील अनाचार, बहुसंख्य अज्ञानी जनांमध्ये दिसून येणारी अधर्मपरायणता या सर्वांमुळे व्यथित झालेल्या मार्तंड दीक्षितांना असे वाटले की, कोणीतरी दिव्य पुरुष अवतरल्याखेरीज या सर्वगामी आणि खोलवर रुजलेल्या धर्मग्लानीला दूर करता येणे अशक्य आहे. त्यामुळे परमेश्वराचा अवतार पृथ्वीवर घडावा या हेतूने श्रीमत् मार्तंड दीक्षितांनी कांही विशेष तपस्या करण्यास प्रारंभ केला. त्या तपस्येचाच एक भाग म्हणून कर्नाटकातील देवरहिप्परगी या स्थानी त्यांनी मंत्रानुष्ठान सुरु केले. देवरहिप्परगी हे भगवान श्रीमार्तंडभैरव खंडोबारायाचे अधिष्ठान असलेले कर्नाटकातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र होते. भगवान श्री मार्तंडभैरव हे मार्तंड दीक्षितांचे कुलस्वामी होत. धर्मोध्दारासाठी परमेश्वराचे अवतरणच व्हावे या हेतूने भगवान श्री मार्तंड भैरवांना प्रसन्न करून घेण्याच्या हेतुने देवरहिप्परगी या गावी श्रोत्रीय ब्रम्हनिष्ठ श्रीमार्तंड दीक्षितांनी मंत्रानुष्ठान सुरु केले. त्यांच्या मंत्रानुष्ठाने प्रसन्न होवून श्री मार्तंडभैरव खंडोबारायांनी मार्तंड दीक्षितांना दर्शन देवून त्यांना सुदूर दक्षिणेकडे असलेल्या तामिळनाडूमधील ‘आकाशचिदंबरम’ या प्रसिध्द शैवक्षेत्री जावून तिथे अनुष्ठान करण्याची आज्ञा दिली. आकाशचिदंबर हे तमिळभूमीमध्ये प्रतिष्ठित असलेल्या पाच प्रमुख शिवक्षेत्रांपैकी एक क्षेत्र होय. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच भौतिक तत्वांचा माध्यम म्हणून स्वीकार करून भगवान परमशिव तमिळभूमीमध्ये अतिप्राचीन युगामध्ये ज्या पाच क्षेत्री अवतीर्ण झाले त्यापैकीच आकाशचिदंबर हे एक प्रमुख क्षेत्र होय. कांचीपुरम् येथील पृथ्वीतत्वांतर्गत ‘एकांबरेश्वर’, कालहस्ती क्षेत्रातील जलतत्वांतर्गत ‘ज्ञानप्रसूनेश्वर’, तिरुवण्णमलई अरुणाचलम येथील अग्नीतत्वांतर्गत ‘अरुणाचलेश्वर’, तिरुचिरापल्ली येथील वायूतत्वांतर्गत ‘जम्बुकेश्वर’ आणि चिदंबरम येथील आकाशतत्वांतर्गत ‘नटेश्वर’ हीच ती पाच भौतिक तत्वांतर्गत प्रतिष्ठीत असलेल्या भगवान श्री परमशिवाचा विग्रह अधिष्टीत असलेली पाच शैव क्षेत्रे होत. यातील आकाशचिदंबरम या क्षेत्री अतिप्राचीन युगात भगवान परमशिवांनी आनंदभैरव नटेश्वर अथवा नटराज हा अवतार धारण करून दिव्य लीला केली आणि त्या क्षेत्री आकाशतत्वस्वरूप लिंगाच्या माध्यमातून अखंड वास करून आर्त, अर्थार्ती, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा चतुर्विध भक्तांना अभ्युदय आणि नि:श्रेयसाचा मार्ग दाखविला. भगवान श्री आनंदभैरव नटेश्वर हे नृत्यादी कलांचे अधिष्ठात्री महादेवता होय, एवढीच त्यांच्याबद्दलची धारणा आजच्या समाजमानसामध्ये रूढ आहे. परंतु भगवान श्री परमशिवावतार आनंदभैरव नटराज हे श्रीविद्यामहायोगपरंपरेतील तीन प्रमुख दिव्य आचार्यांपैकी एक महान दिव्याचार्य होत ही माहिती फारच थोडयाजणांना असावी. अतिप्राचीन कल्पांमधून आणि युगांमधून अवतार धारण करून अधिकारी देवता आणि ऋषींना श्रीविद्यामहायोगाचा उपदेश करणारे तीन प्रमुख दिव्य विश्वमहागुरू होवून गेले. भगवान विष्णुचे अवतार असलेले भगवान श्री हयग्रीव महर्षि, भगवान परमशिवाचे अवतार असलेले भगवान श्री आनंदभैरव नटराज अथवा नटेश्वर आणि भगवान परमशिवाचेच अवतार असलेले महाकैलासभुवनाधिष्ठीत भगवान श्री दक्षिणामूर्ती हेच ते तीन दिव्य महाचार्य होत की ज्यांनी अतिप्राचीन युगांमध्ये अवतरून देवता आणि ऋषीमुनींमध्ये श्रीविद्यामहायोग साधनेचा प्रचार-प्रसार केला. यातील भगवान श्री आनंदभैरव नटराज यांचे अवतार स्थळ असलेले आकाश चिदंबरम् हे क्षेत्रच कालांतराने महाशैव क्षेत्र म्हणून नावारूपास आले. भगवान श्री मार्तंडभैरवाच्या आदेशाला अनुसरून वेदमूर्ती मार्तंड दीक्षितांनी आकाश चिदंबरम् येथे तपस्या करून भगवान श्री आनंदभैरव नटराजाला प्रसन्न करून घेतले व भगवान परमशिव नटेश्वरांनी सनातन वैदिक धर्मोद्धारासाठी अवतार धारण करावा असा त्यांना वर मागितला.
श्री नटेश्वरांनी या वरदानाची पूर्ती करण्यासाठी दीक्षित दांपत्याचे पोटी अवतार धारण केला. साक्षात् चिदंबर नटेश्वर मानवी देहाने अवतार धारण करून आल्याने नवजात शिशुचे नांवही चिदंबर असे ठेवण्यात आले. हा शिशूच कालांतराने ‘श्री चिदंबर महास्वामी’ या नांवाने सत्पुरुष म्हणून प्रसिद्ध झाला. श्री चिदंबरमहास्वामी हे विवाहित असून त्यांना सौ. सरस्वती व सौ. सावित्री अशा दोन पत्नी होत्या. या दोन्ही पत्नींपासून त्यांना दिवाकर, शंकर, भास्कर, मृत्यूंजय, वररुचि आणि काशीनाथ असे सहा पुत्र झाले आणि एक कन्या झाली. पिताश्री मार्तंड दीक्षित यांनी बालचिदंबराच्या उपनयन संस्कार कालीच बालचिदंबरास गायत्री महामंत्राबरोबरच श्रीविद्यामहायोग साधनेमध्ये सुद्धा दीक्षित केलेले होते. पित्याच्या आज्ञेचे व मार्गदर्शनाचे अनुसरण करीत श्री चिदंबर आजन्म श्रीविद्यामहायोग साधनेमध्ये प्रवृत्त राहून अखंड तपस्या करीत राहिले. आपल्या सत्तावन्न वर्षांच्या अवतारी जीवनामध्ये श्री चिदंबरस्वामी महाराजांनी अगदी बालपणापासून जडचालन, मृतसंजीवन, अनेक देहधारण, अंतःसाक्षित्व, पंचभूततत्वजय, अमर्याद निग्रहानुग्रह सामर्थ्य, देशकालवस्तु निरपेक्ष परमस्वतंत्र अशा इच्छा, ज्ञान, क्रियाशक्तींचा अविष्कार अशा अवतारित्वसूचक अनेक लीला तर केल्याच परंतु त्याच बरोबर भक्ती, ज्ञान, वैराग्ययुक्त विहित कर्माचरण, गुरुसेवा, पितृसेवा, मातृभक्ती, सकलदीन दुःख जडजीवांविषयी क्रियाशील कारुण्यभाव, शम, शांती, तितिक्षा, अमानित्वादि दैवी साधनसंपत्ती अशा सर्व लोकोत्तर दैवी गुणांनी भूषित असे एक आदर्श जीवन जगून एक महान असा पारमार्थिक आदर्श त्याकाळातील समाजापुढे ठेवला. श्री चिदंबर महास्वामी श्रौताग्निहोत्री होते. आपल्या अवतारी जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये श्री चिदंबरमहास्वामींनी अभूतपूर्व असे सोमयागाचे अनुष्ठान घडविले. त्या सोमयागाचे प्रसंगी त्या काळातील अनेक सिद्ध महात्मे उपस्थित होते अशी माहिती मिळते. निग्रहानुग्रह अमर्याद सामर्थ्यास प्रकट करीत अविरत लोकसंग्रह, लोककल्याण आणि धर्मजागरणाद्वारे लोकशिक्षण करून पौष शुद्ध चतुर्थी शके १७३७ अर्थात इ.स. १८१५ रोजी महायोगीश्वर भगवान श्री चिदंबर महास्वामींनी योगमार्गाने अर्थात योगशास्त्रोक्त देहविसर्जनाच्या प्रक्रियेचा अवलंब करून आपली स्थूल भौतिक देहाने केलेली लीला संपविली. सध्याच्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यात असलेल्या मुरगोड या गावी कार्तिक वद्य षष्ठी शके १६८० अर्थात इ.स. १७५८ या दिवशी अवतार धारण केलेल्या चिदंबरमहास्वामींनी त्यानंतर जवळ जवळ ५७ वर्षे अवतार लीला करून वर सांगितलेल्या दिवशी आपली स्थूल भौतिक देहाने केलेली अवतार लीला संपविली असे असले तरी त्यांच्या निग्रहानुग्रहात्मक शक्तीस देह, देश, काल व वस्तु यांचे बंधन नाही.
भगवान श्री चिदंबरमहास्वामी आपल्या आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा चतुर्विध भक्तांच्या प्रार्थनेला स्मर्तृगामी असल्यामुळे त्वरित प्रतिसाद देतात, असा सश्रद्ध भक्तगणांचा अबाधित अनुभव आहे. आपल्या दिव्य चिन्मय देहावर कलिप्रभाव निरुद्ध करणारे विराट दिव्य तप करीत भगवान श्रीचिदंबरमहास्वामी वेदोक्त, सनातन धर्मोद्धारासाठी आवश्यक असलेल्या दिव्यशक्तीचे उत्सर्जन करण्याचे महान देवकार्य आजही करत आहेत अशी अंतरंगानुभवी सत्पुरुष ग्वाही देतात. आपण वर म्हंटलेले आहेच की, श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ श्रीमत् मार्तंड दीक्षित हेच भगवान श्री चिदंबर महास्वामींचे श्रीविद्यामहायोग साधनेचे सद्गुरु होते. श्री स्वयंप्रकाशस्वामी महाराजांकडून प्राप्त झालेल्या ब्रह्मविद्येचा सानुग्रह उपदेश ब्रह्मश्री मार्तंड दीक्षितांनी आपले चिरंजीव परमशिवाचे अवतार भगवान श्री चिदंबर महास्वामींना केला. भगवान चिदंबर महास्वामी जन्मसिद्ध असूनही त्यांनी गुरुशिष्यपरंपरेचा आदर करण्यासाठी ‘शिष्टानुमोदित गुर्वनुग्रह’ परंपरा आपल्या पूज्य वडिलांकडून स्वीकारली व लोकसंग्रहार्थ तिचे उपदेशाद्वारे संवर्धनही केले. श्री चिदंबर महास्वामी महाराजांचे श्रीविद्यामहायोग साधनपरंपरेतील दीक्षानाम श्री पूर्णानंदनाथ असे होते. श्रीमत् पूर्णानंदनाथांनी अर्थात् भगवान चिदंबरमहास्वामींनी श्रीविद्यामहायोगाचा उपदेश आपले शिष्योत्तम श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ श्रीमान राजाराम महाराज ठाकूर – परदेशी यांना केला. श्रीमान हरिसिंग परदेशी आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या क्षत्रिय राजपूत दाम्पत्याच्या पोटी श्रीमान राजाराम महाराजांचा जन्म बाभुळगाव गंगा या गावी फाल्गुन वद्य द्वितीया शके १६९० अर्थात इ.स. १७६८ या रोजी झाला. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्याच्या शेजारी गोदावरी नदीच्या तीरावर बाभुळगांव नावांचे छोटे खेडेगांव आहे. तेच श्री राजाराम महाराजांचे जनस्थळ होय. बालपणापासूनच परमार्थाची आवड असलेल्या श्री राजाराम महाराजांना सद्गुरू दर्शनाची तीव्र इच्छा झाली होती. उपजीविकेचा व्यवसाय म्हणून राजाराम महाराज त्यावेळच्या पुण्याच्या पेशव्यांकडे शिलेदार म्हणून नोकरी करीत असत. मध्यप्रदेशातील होशंगाबाद हे त्यांचे व्यवसायक्षेत्र होते. त्या ठिकाणी पाचशे घोडेस्वारांचे प्रमुख म्हणून नेतृत्व करीत राजाराम महाराजांनी पेशव्यांची शिलेदार म्हणून नोकरी केली. हे करीत असतानाच परमार्थ लाभ व्हावा म्हणून पंढरपूरक्षेत्री आले असता तेथे धर्मराजनामक बडव्याबरोबर त्यांची भेट झाली होती. त्यांचे बरोबर पारमार्थिक चर्चा करत असता त्यांनी असे सांगितले की, सध्या कर्नाटकात मुरगोड गांवी साक्षात परमशिव हेच चिदंबरमहास्वामींच्या रूपाने लोकोद्धार करीत आहेत. धर्मराजाकडून हे वृत्त ऐकताच राजाराम महाराजांनी चिदंबरमहास्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मुरगोड गाठले. यावेळेस चिदंबरमहास्वामींचे वय सत्तेचाळीस वर्षाचे होते व राजाराम महाराजांचे वय सदतीस (३७) वर्षाचे होते. श्री राजाराम महाराज जवळ-जवळ १० वर्षे चिदंबरमहास्वामींच्या सहवासात राहिले. श्री चिदंबरमहास्वामीं पासूनच श्रीविद्यामहायोग साधनाक्रमांतर्गत चारही महावाक्यांचा उपदेश लाभला आणि ते ब्रह्मनिष्ठ पदास पोहचले. श्री चिदंबरमहास्वामीमहाराजांच्या कृपेने श्री राजाराम महाराजांना अद्भूत काव्यप्रतिभा लाभलेली होती. त्यांनी लिहिलेले ‘अद्वैतसार’, ‘ब्रह्मानंदलहरी’, ‘अमृतानंद’ यासारखे ओवीबद्ध ग्रंथ त्यांच्या अतुलनीय ब्रह्मनिष्ठेची साक्ष देतात. श्रीमान राजाराम महाराजांनी लिहिलेले श्रीचिदंबरमहास्वामींचे अभंगात्मक चरित्र ही त्यांची एक लोकोत्तर वाङमयीन कृती होय. श्री चिदंबरमहास्वामींच्या प्रत्यक्ष सहवासात जवळ-जवळ १० वर्षाचा काळ व्यतीत केलेल्या राजाराम महाराजांनी श्री चिदंबरमहास्वामींच्या लोकोत्तर लीला स्वतः प्रत्यक्ष पाहिलेल्या व अनुभवल्या होत्या. त्या सर्वांची अत्यंत दक्षतेने व भक्तीभावाने नोंद करणारी त्यांची चिदंबरचरित्रात्मक अभंगगाथा हा भगवान श्री चिदंबरमहास्वामींच्या लोकोत्तर चरित्राची माहिती वर्तमानकाळात उपलब्ध करून देणारा एक अमोल ठेवा आहे असेच म्हटले पाहिजे. ब्रह्मनिष्ठ पूज्य श्री राजाराम महाराजांनी ही चिदंबर चरित्रपर अभंगगाथा रचली नसती तर कदाचित चिदंबरमहास्वामींचे लोकोत्तर जीवन हे भावी पिढीला अज्ञानातच राहिले असते. नामस्मरण साधनेचा उपदेश करीत चिदंबरभक्तीचा प्रचार-प्रसार करणारे राजाराम महाराज हे स्वतः महान भगवद्भक्त होतेच परंतु त्यांच्याबरोबर अलौकीक सिद्धीसंपन्न महायोगीही होते. कार्तिक वद्य द्वितीया शके १७६५ अर्थात इ.स. १८४३ रोजी स्वत:च्या देहातच दिव्य योगाग्नी प्रज्वलित करून आपल्या स्थूल देहासहित श्री राजाराम महाराज भगवान श्री चिदंबराच्या सच्चिदानंद स्वरूपात लीन झाले. आपल्या दिव्य पारमार्थिक जीवनाची त्यांनी केलेली हि परिसामाप्ती ते एक उच्चकोटीचे महायोगी पुरुष होते याची स्पष्ट साक्ष देते.
ब्रम्हश्री बाळशास्त्री भट
ब्रम्हनिष्ठ श्री राजाराम महाराजांच्या परंपरेत होवून गेलेले एक थोर महायोगी सत्पुरुष म्हणजेच ब्रम्हश्री बाळशास्त्री भट हे होत. एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होवून गेलेले ब्रम्हश्री बाळशास्त्री भट हे मध्यप्रदेशातील इंदूरचे रहिवासी होते. भगवान श्री चिदंबरमहास्वामी आणि श्रोत्रिय ब्रम्हनिष्ठ राजाराम महाराज यांच्या परंपरेतून लाभलेला श्रीविद्यामहायोग ब्रम्ह्श्री बाळशास्त्री भटांनी स्वतः केलेल्या आजीवन साधनेद्वारे परिपुष्ट केला आणि उपदेशाद्वारे अधिकारी शिष्यांमध्ये श्रीविद्यामाहायोग साधनेचा प्रचार-प्रसार ही केला. अंतरंगातून श्रीविद्यामहायोगाची साधना करणारे बाळशास्त्री हे बहिरंगातून वैदिक श्रौताग्निहोत्री होते. आपल्या सभोवताली जमलेल्या शिष्यांना त्यांच्या अधिकारानुसार कोणास श्रौताग्निहोत्राची दीक्षा देवून, तर कोणास वेदाध्यानात तत्पर करून, तर एखाद्यास गायत्री उपासनेत प्रेरणा देवून तर अन्य अधिकारी शिष्यांना श्रीविद्यामहायोगात दीक्षित करून ब्रम्हश्री बाळशास्त्री भटांनी आजीवन परमार्थ प्रचार-प्रसाराचे कार्य केले.

परमपूज्य ब्रम्हश्री चिंतामणशास्त्री गणेश प्रथम
परमपूज्य ब्रम्हश्री चिंतामणशास्त्री गणेश प्रथम
ज्या कांही दुर्मिळ अधिकारी जनांना त्यांनी श्रीविद्याअखंडमहायोगाचा उपदेश केला त्यापैकीच एक सत्पुरुष म्हणजे ब्रम्हश्री चिंतामणशास्त्री गणेश प्रथम होत. ब्रम्हश्री चिंतामणशास्त्री हे सध्याच्या रायगड जिल्ह्यातील पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या चौल गावचे रहिवासी होते. चौल हे आजही महान साधन क्षेत्र आहे. विश्वमहागुरूवरेण्य अखंडमहायोगीश्वर भगवान श्री परशुरामांनी स्वतःच्या निवासासाठी अपरांत अर्थात कोकणभूमीची निर्मिती केल्यानंतर सत्य सनातन धर्म त्या भूमीत प्रतिष्ठित करण्यासाठी जी तीर्थक्षेत्रे, साधनक्षेत्रे अपरांत भूमीमध्ये उभारली त्यामध्ये चौल हे प्रमुख साधनक्षेत्र होते. श्रीस्थानक म्हणजे सध्याचे मुंबई जवळील ठाणे हे नगर त्यापैकी दुसरे एक साधनक्षेत्र होते. भगवान श्री परशुरामांच्या प्रेरणेने आणि अनुग्रहाने या सर्व साधनक्षेत्रांमध्ये वेदवेत्त्या अग्निहोत्री, श्रीविद्योपासकांची अनेक घराणी प्रतिष्ठित झाली आणि पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडून श्रीविद्यामहायोगाची साधना अविछिन्न पद्धतीने जिवंत राहिली असे उल्लेख आढळतात. अस्तु! ब्रम्हश्री चिंतामणशास्त्री प्रथम हे वर उल्लेख केलेल्या चौल गावचे रहिवासी होते. श्रीविद्यामहायोग साधनेचा सानुग्रह उपदेश त्यांना बाळशास्त्री भट यांच्याकडून प्राप्त झाला. स्वतः चिंतामणशास्त्री प्रथम हे महागणपतीचे अत्यंत निष्ठावान अनन्य उपासक होते. भगवान श्री महागणपतीचा सगुण साक्षात्कार अनुभविलेल्या चिंतामणशास्त्रींचे जीवन अनेक अद्भूत लोकोत्तर घटनांनी भरलेले होते की जे सुव्यवस्थित लिखित स्वरुपात समाजापुढे न आल्यामुळे आजही बरेचसे अज्ञात आहे. एकतारीवर भगवान श्री मोरयाची भजने प्रेमळ सुरात गाणारे हे चिंतामणशास्त्री वेदोक्त कर्मनिष्ठा, सगुणभक्ती आणि श्रीविद्येसारख्या गूढ योग प्रक्रियेमधील अद्दभूत तत्परता या वरवर परस्परविरोधी वाटणाऱ्या साधनक्रमांचा आपल्या लोकोत्तर जीवनात महासंगम घडवून आणलेले एक थोर महायोगी होते. यावरूनच त्यांच्या पारमार्थिक विभूतिमत्वाच्च्या असमान्यतेची कल्पना येईल.

भगवान श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती
भगवान श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती
भगवत् पूज्यपाद आद्यशंकराचार्यांनी महायोग साधनेच्या प्रसारासाठी शंकर, बोध, पद्मपादादी पाच यतीवर्य शिष्य प्रतिष्ठीत केलेले होते. त्यांच्याद्वारे श्री मदाचार्यांनी स्थापित केलेल्या मठांमधून श्रीविद्यामहायोग साधना करून सिद्ध स्थितीत पोहचलेल्या संन्यस्त योग्यांची परंपरासुद्धा गुरुशिष्य क्रमांमधून अविछिन्नपणे प्रवाहित होत राहिली. त्या परंपरेतील एक अत्यंत श्रेष्ठ संन्यस्त योगीवर्य म्हणजे भगवान श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीपाद हे होत. १८९४ साली जन्म घेवून १९०७ साली म्हणजे वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ब्रहमचर्यामधून संन्यस्त होऊन कांचीपूरम् येथील कांचीकामकोटी शंकरपीठावर पीठाधिपती म्हणून आरूढ झालेल्या श्रीमत् चंद्रशेखरस्वामीपादांनी त्यानंतर जवळ जवळ ८८ वर्षे पीठाधिपती या भुमिकेमधून सनातन धर्म प्रचार-प्रसाराचे जे अतुलनीय कार्य केले ते आजही सर्वज्ञात आहे. निष्कलंक, ब्रहमचर्य, पराकोटीची निस्पृह त्यागी मनोवृत्ती, वेदादीशास्त्रांवरील प्रकांड पांडित्य, योगाभ्यास आणि संन्यास धर्माच्या आचरणामधून केली जाणारी निरंतर दीर्घ कालीन खडतर तपश्चर्या, सनातन धर्म प्रचार-प्रसाराच्या हेतुने आसेतु हिमाचल भारत वर्षातून केलेल्या पदयात्रा या सारख्या असंख्य दिव्यगुण संपत्तीमधून श्रीमन् चंद्रशेखरेंद्रसरस्वती स्वामीपांदांचे जे ईश्वरीय विभूतीमत्व जगासमोर प्रगट झाले त्यामुळेच एक चालता बोलता संचारी देव या दृष्टीने समाजातील सर्वस्तरातील भाविकजन त्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहू लागले. सनातन धर्माच्या उद्धारासाठी अवतरलेले एक अधिकारसंपन्न सिद्धर्षि ही त्यांची ख्याती केवळ भारतवर्षापुरतीच मर्यादित न राहता भारताबाहेरील देशविदेशात पोहोचली. परम निःश्रेयसाचे स्वरूप व त्याच्या प्राप्तीचा मार्ग समजून घेवू इच्छिणाऱ्या जिज्ञासू जनांचा अखंड ओघच साऱ्या जगामधून त्यांच्याकडे वाहू लागला.
समस्त तमिळभाषी जनांमध्ये ‘पेरियवाल’ म्हणून आत्यंतिक आदराचे स्थान मिळविलेल्या भगवान श्री चंद्रशेखरेंद्र स्वामीपादांना संपूर्ण जगातील परमार्थ प्रेमीजन ‘परमाचार्य’ म्हणून ओळखू लागले. श्री परमाचार्य भगवान चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे आधुनिक काळातील एक सर्वश्रेष्ठ श्रीविद्यामहायोगी होते हे आता वेगळे सांगायला नको. सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी तामिळनाडूमधील कांचीपुरम् येथे भगवती श्री कामाक्षी देवीच्या सानिध्यामध्ये कामकोटिपीठ स्थापन करून त्यावर स्वतःच प्रथम पीठाधिपती म्हणून आरूढ होवून भगवान श्री आदिशंकरभगवद्पादांनी गुरुशिष्य क्रमांमधून श्रीविद्यामहायोगी संन्यस्त पीठाधिपतींची जी एक अविछिन्न परंपराच कांचीपीठाच्या माध्यमातून प्रवर्तित केली. त्या अविछिन्न क्रमिक परंपरेतील श्रीमत् चंद्रशेखरेंद्रसरस्वती ६८ वे आचार्य होते. आपल्या दिव्य अवतारी जीवनाची शताब्दी पूर्ण करून भगवान श्रीमत् चंद्रशेखरेंद्रसरस्वतीस्वामीपादांनी मोक्षपुरी कांची येथे शके १९१५ श्रीमुखनाम संवत्सर मार्गशीर्ष कृष्ण एकादशी अर्थात् सफला एकादशी वार शनिवार रोजी अर्थात दि. ८ जानेवारी १९९४ रोजी दुपारी ३:३० वाजता समाधिस्थ होवून विदेह कैवल्य प्राप्त करून घेतले. आपल्या दिव्य तपस्यामय शतवर्षात्मक जीवनामधून पीठाधिपतीत्वाचा जो महान आदर्श भगवान श्री परमाचार्यांनी मूर्त करून दाखविला त्यामुळे कांचीकामकोटिपीठ त्यांच्या मागेही अनंत काळापर्यंत पारमार्थिक वैभवाने अखंड शोभायमान राहील यात संशय नाही. भगवानश्री चंद्रशेखरेंद्र सरस्वतीस्वामी महाराज साक्षात श्रीविद्या त्रिपुरेश्वरीची चालती बोलती मूर्ती होते. भगवती श्री कामाक्षीच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाशी सदेह सामीप्य आणि सामरस्य प्राप्त करून घेतलेले भगवान श्री परमाचार्य हे श्रीविद्यामहायोग साधन क्रमातील मर्मज्ञ सिद्धाचार्य होते. आपल्या सभोवताली जमलेल्या सश्रद्ध जनांमधून पारमार्थिक साधकांना हेरून त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार कोणास वेदोक्त कर्म करण्यास प्रवृत्त करावे, तर कोणास वेदांतादि शास्त्राध्ययनात प्रवृत्त करावे तर एखाद्या भाविकास सहज सुलभ नामस्मरण साधनेमध्ये प्रेरित करावे, तर एखाद्या गुह्य साधनाधिकारसंपन्न व्यक्तीस श्रीविद्यामहायोगासारख्या गूढ साधन मार्गामध्ये प्रवृत्त होण्यास प्रेरणा द्यावी अशा पद्धतीने परमार्थ साधनेची प्रकाशद्वारे उघडीत संसारातील जनांना सच्चिदानंदपरब्रह्मपरमात्माभगवत्स्वरूप परमार्थतत्वाकडे उन्मुख करण्याचे महान देवकार्य करणारे भगवान श्री चंद्रशेखरेंद्रसरस्वती आपल्या स्वतःच्या व्यक्तीगत जीवनामध्ये जीवनाच्या अंतीम क्षणापर्यंत अखंड श्रीविद्यासाधनेमध्ये रत होते.
मंत्रयोग, लययोग, राजयोग आणि हटयोग या श्रीविद्येची प्रमुख अंगे असलेल्या प्रमुख योगप्रक्रियांवरील व त्यांच्या अंतर्गत असलेल्या अनेकविध योगप्रक्रियेवरील त्यांचे प्रात्यक्षिक प्रभुत्व लोकविलक्षण होते. आपल्या सभोवताली जमलेल्या योगप्रेमी साधकांना त्यांच्या अधिकारानुरूप वर उल्लेखिलेल्या योगप्रक्रियांपैकी कोणत्या तरी एका योग प्रक्रियेमध्ये प्रवेश देवून त्यांना श्रीविद्यामहायोगात प्रवृत्त करण्याची एक विलक्षण हातोटी भगवान श्रीमत् चंद्रशेखरेंद्रसरस्वतीस्वामींच्या ठिकाणी दिसून यायची. भगवान श्री परमाचार्यांच्या प्रत्यक्ष साधनारत अशा दिव्य जीवनामुळेच कांचीकामकोटि शांकरपीठ श्रीविद्यामहायोग साधनेच्या प्रचार-प्रसाराचे त्यांच्या जीवन कालावधीमध्ये एक जिवंत केंद्र म्हणूनच झळकत राहिले. भगवान श्री आदिगुरु दक्षिणामूर्ती पासून पूज्यपाद परमाचार्य श्रीमत् चंद्रशेखरेंद्र सरस्वती आणि पूज्यपाद श्री ईश्वरशास्त्री दीक्षित उपाख्य श्रीमत् योगेश्वर महाराज या आधुनिक विसाव्या शतकातील महायोगी वरेण्यांपर्यंत येवून पोहचलेल्या श्रीविद्यामहायोग परंपरेचा वारसा लाभलेले वर्तमान काळातील अधिकारसंपन्न महायोगी म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल ते म्हणजे आपले परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी काटकर हे होत. महाराष्ट्रातील महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसलेल्या सोलापूर या गावी जामदग्न्य गोत्री, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणकुळात दि. १२ सप्टेंबर १९४६ रोजी जन्म घेतलेल्या श्रीनिवासजींच्या व्यक्तिमत्वामध्ये कुमारवयामध्येच परमार्थविषयाची जिज्ञासा व रुची विकसित झालेली होती. परमार्थतत्वाची परिपूर्ण अनुभूती देवू शकणाऱ्या सद्गुरूंच्या शोधाच्या निमित्ताने अनेक अधिकार संपन्न सिद्ध व साधक योग्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नामधूनच श्रीनिवासजी तारुण्याच्या ऐन बहारामध्येच अर्थात् पंचविशीमध्येच कांचीकामकोटिपीठाधीश्वर भगवान श्री चंद्रशेखरेंद्रसरस्वती – श्री परमाचार्य यांच्या सहवासात आले. भगवान श्री कांची परमाचार्यांनी अगदी प्रथम भेटीमध्येच श्रीविद्यामहायोगातील एक अत्यंत गुह्य व दुर्मिळ अशी “वेध” दीक्षा कृपाकटाक्षाद्वारे श्रीनिवासजींना देवून त्यांना श्रीविद्यामहायोगाच्या दिव्य प्रकाशमय पथामध्ये प्रविष्ट करून घेतले. ही दिव्य दीक्षा प्राप्त होण्याचा योग १९७५ सालातील मे महिन्यामध्ये जुळून आला. तेव्हापासून भगवान श्रीपरमाचार्य श्रीमत् चंद्रशेखरेंद्रसरस्वतीस्वामीमहाराजांच्या श्रीमुखातून प्राप्त होणाऱ्या उपदेशाद्वारे व त्यांच्याच कृपेने प्राप्त होत गेलेल्या दिव्य दृष्टीने व सहवासामधून श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांची श्रीविद्यामहायोगसाधना उत्तरोतर विकसीत आणि वृद्धिंगत होत राहिली. साधारणपणे १९७८ च्या सुमारास भगवान श्री परमाचार्यांनी कांचीपुरमहून प्रस्थान करून उत्तर दिशेने आंध्र व कर्नाटकामधून निवडक शिष्यगणांसमवेत पदयात्रा करण्यास प्रारंभ केला. या पदयात्रेच्या क्रमामधूनच आपला दिव्य धर्मसंचार करित करित भगवान श्री परमाचार्य - श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीमहाराज महाराष्ट्रामध्येही प्रविष्ट झाले आणि सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमधून पदयात्रा करित तेथील लोकांवर कृपापूर्वक धर्मज्ञानाचा वर्षाव करू लागले. तामिळनाडूतील कांचीपुरम् येथील मठस्थानाकडे परत जाण्याच्या क्रमामधून श्रीकांचीस्वामीमहाराजांची पदयात्रा महाराष्ट्रातून पुन्हा कर्नाटक व कर्नाटकातून आंध्र अशा क्रमाने मार्गस्थ होत पुन्हा तामिळनाडूमधील कांचीपुरम् येथे पोहचली. वयाची ८५ वर्षे उलटल्यानंतर भगवान श्री परमाचार्य – श्रीकांचीस्वामी महाराजांनी १९७८ मध्ये आरंभलेली ही पदयात्रा १९८३ साली कांचीपुरम् येथेच पूर्ण झाली. पाच वर्षांच्या या प्रदीर्घ पदयात्रेमधून भगवान परमाचार्यांची दिव्य तपोमूर्ती तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्राच्या प्रांतातून दिव्य संचार करित असताना त्यांचा दिव्य सहवास आणि उपदेश प्राप्त करून घेण्याच्या हेतूने श्री गुरुदेव श्रीनिवासजी मधून मधून आपल्या सवडीनुसार भगवान श्री परमाचार्यांच्या पदयात्रेमध्ये संम्मिलीत व उपस्थित रहात असत. याच कालखंडात पूज्यश्री जगद्गुरुदेव भगवान श्री परमाचार्यांच्या सहवासात श्री गुरुदेव श्रीनिवासजींची महायोगसाधना विकसित होत असताना एका प्रसंगी भगवान श्रीपरमाचार्य श्रीकांचीमहास्वामी चंद्रशेखरेंद्रसरस्वतीश्रीचरणांकडून श्रीगुरुदेव श्रीनिवासजींना आदेश झाला की, महायोगसाधनेतील उर्वरित आणि अधिकाधिक उन्नत होत जाणाऱ्या साधनक्रमांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी त्यावेळी महाराष्ट्रातच सांगली नगरामध्ये निवास करून राहणाऱ्या महायोगीवरेंण्य पूज्यपाद श्रीमत् ईश्वरशास्त्री दीक्षित यांच्या सहवासात जावे व त्यांच्या अनुग्रहपूर्वक मार्गदर्शनाखाली येवून पुढील श्री विद्यामहायोग साधना करावी. भगवान श्रीमत् परमाचार्यांकडून हा आदेश प्राप्त झाल्यानंतर श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांनी सांगलीनगर गाठले आणि पूज्यपाद महायोगीराज श्रीमत् ईश्वरशास्त्री यांची भेट घेतली. भगवान चंद्रशेखरेंद्रसरस्वती स्वामीमहाराजांनी आपल्याकडे पाठवलेला हा तरुण मुलगा आपल्याजवळ असलेल्या श्रीविद्यामहायोग साधनेचे अपरंपार भांडार प्राप्त करून घेण्यामध्ये पूर्ण अधिकारी असून तोच आपली महायोगपरंपरा चालविण्यास परिपूर्ण पात्र असलेला भावी कालातील उत्तराधिकारी आहे, हे आपल्या दिव्य प्रज्ञेने ओळखलेल्या पूज्य श्री ईश्वरशास्त्रींनी अत्यंत प्रसन्न मनाने श्रीनिवासजींचा शिष्य म्हणून स्वीकार केला. त्यांना श्रीविद्यामहायोगसाधनेतील उत्तरोत्तर उन्नत होत जाणाऱ्या अवस्थांमधून क्रमाक्रमाने दीक्षित करित करित श्रीगुरुदेव श्रीनिवासजींना त्यांच्या पत्नी सौ. सुलक्षणादेवींसमवेत श्रीविद्यामहायोग साधनेच्या अंतीम टप्प्यापर्यंत अर्थात् पूर्णाभिषेक दीक्षेमध्ये अभिषिक्त व प्रतिष्ठीत केले. शके १९०६ रक्ताक्षीनाम संवस्तरातील वैशाख शुक्ल एकादशी अर्थात मोहिनी एकादशी या दिवशी शुक्रवारी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे दि. ११ मे १९८४ रोजी श्रीविद्यामहायोग साधनेतील ‘पूर्णाभिषेक’ ही सर्वश्रेष्ठ दीक्षा पूज्यपाद सद्गुरुदेव श्रीमत् ईश्वरशास्त्री योगेश्वर दीक्षित महाराज यांचेकडून श्रीनिवासजींना लाभली.

पूज्यपाद श्री ईश्वरशास्त्री दीक्षित
पूज्यपाद श्री ईश्वरशास्त्री दीक्षित
परमपूज्य ब्रम्हश्री चिंतामणशास्त्री गणेश प्रथम यांचे कडून अनुगृहीत होवून श्रीवीद्यमहायोगसाधनपरंपरा मोठया निष्ठेने गतीमान करणाऱ्या त्यांच्याकाही शिष्योत्तमांपैकी परमपूज्य पंडीतवरेण्य ब्रम्हश्री ईश्वरशास्त्री दीक्षित हे मुळचे कर्नाटकातील तडकोड या गावचे रहिवासी होते. त्यांची मातोश्री या चिदंबरमहास्वामी महाराजांच्या वंश परंपरेतील होत्या. बालपणापासूनच पारमार्थिक जीवनाची आवड असणाऱ्या पंडीत ईश्वरशास्त्रींना त्यांच्या कुमारवयातच त्यांचे दूरचे चुलते श्री अपण्ण दीक्षित यांच्या सहवासात योगाभ्यासाची गोडी लागली. श्री अपण्ण दीक्षित हे योग, मंत्रशास्त्र, वेदोपनिषदामधून प्रसिद्ध असलेल्या विविध विद्यारूप उपासना यामध्ये अत्यंत प्रवीण होते. त्यांच्याकडून प्रेरित होऊनच कुमारवयातील श्री ईश्वरशास्त्रींनी तात्कालीन सांगली संस्थानाद्वारे चालविल्या जाणाऱ्या वेदशास्त्र पाठशाळेमध्ये प्रवेश केला आणि त्या पाठशाळेतील प्रधान आचार्य पंडित व्यकंटेशशास्त्री अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेदादिशास्त्राचे सखोल अध्ययन केले. महाराष्ट्रामध्ये पाणिनीय व्याकरणाच्या अभ्यासाची परंपरा समर्थपणे चालविणाऱ्या महापांडित्य संपादन केलेल्या पंडितवरेंण्य श्रीवासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचे श्रीव्यकंटेशशास्त्री अभ्यंकर हे पुतणे होते. व्याकरण, न्याय, मीमांसादि आर्षशास्त्रांचे अध्ययन पंडीत श्रीव्यकंटेशशास्त्रींनी महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचेकडेच केलेले होते. स्वतः श्री व्यकंटेशशास्त्री भगवती श्री दुर्गेचे निःस्सिम उपासक होते. ’सप्तशती’ चा पाठ नित्य करणे हा त्यांच्या नित्योपसनेचा अविभाज्य घटक होता. आपल्या जवळील वेदव्याकरणादि विद्यांच्या बरोबरीने आपल्या चंडीउपासनेचा वारसासुद्धा पंडित श्री व्यकंटेशशास्त्री अभ्यंकरांनी आपले शिष्योत्तम पंडित ईश्वरशास्त्रींना उदार हस्ताने दिला आणि तरुण वयातील श्री ईश्वरशास्त्रींनी तो वारसा तितक्याच आंतरिक विशुद्ध निष्ठेने, सुदीर्घ, निरंतर आणि श्रद्धायुक्त साधनारूप तपस्येने आपल्या पूज्य श्रीगुरुदेवांच्या मागेसुद्धा तितक्याच समर्थपणे चालविला. पूज्यश्री व्यकंटेशशास्त्री अभ्यंकरांच्या निधनानंतर १९४० मध्ये आपल्या दिवगंत श्रीगुरुदेवांच्या इच्छेनुसार पंडीत श्रीईश्वरशास्त्री दीक्षित हे सांगली संस्थान वेदपाठशाळेचे प्रधान आचार्य झाले. आपल्या गुरुदेवांच्या मागे पाठशाळेचा कार्यभाग श्री ईश्वरशास्त्रींनी अत्यंत समर्थपणे चालविला. ऐन पंचविशीमध्येच विवाहित झालेल्या ईश्वरशास्त्रींनी विवाहोत्तर श्रौताग्निहोत्राची उपासना स्वीकारलेली होती. ती उपासना त्यांनी आजीवन अत्यंत निष्ठेने चालविली. सांगली संस्थानने उभारलेल्या सांगलीमधील गणपती मंदीरामधून पंडीत श्री ईश्वरशास्त्रींनी अनेक वर्षे श्री गणरायासमोर प्रवचने करून सर्व सामान्य भाविक जनांमध्ये परतत्वाची जिज्ञासा, धर्मजीवनाची रुची जिवंत ठेवण्याचा अत्यंत तळमळीने प्रयास केला. ‘श्रीगणेशपुराण’, ‘योगवशिष्ठ’, भगवत् श्री विद्यारण्यस्वामीरचित ‘श्रीपंचदशी’ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज रचित ‘अमृतानुभव’ अशा अनेक संस्कृत, प्राकृत ग्रंथावर प्रवचने करून तात्कालीन सांगलीस्थ भाविक जनांमध्ये ईश्वरनिष्ठेची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचे देवकार्य पंडित श्री ईश्वरशास्त्री दीक्षित यांनी अनेक वर्षे अत्यंत निष्ठेने केले. पाठशाळांमधून निवास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच स्वतःच्या घरांमध्ये सुद्धा निवास भोजनाची व्यवस्था करून व त्यांचे पुत्रवत् पालन करून व त्यांच्यामध्ये वेदादिशास्त्रविषयक रुची अध्यापनाद्वारे निर्माण करून ती वाढविण्याचा अथक प्रयत्न पंडीत श्री ईश्वरशास्त्रींनी आजीवन केला. एक निष्ठावान वेदाभ्यासी, संस्कृत भाषेतील विविध आर्ष शास्त्रांमध्ये विलक्षण पांडीत्य संपादन केलेला महापंडीत, अग्निहोत्री उपासक, मंत्रतंत्र ज्योतिष, आयुर्वेद, रसायन या सारख्या गूढ आर्ष विद्यांमधील मर्मज्ञ जाणकार या पंडीत श्री ईश्वरशास्त्रींच्या लोकोत्तर व्यक्तीवैशिष्ट्यामध्ये शिखरसदृश शोभावा, झळकवा असा जर त्यांच्या व्यक्तीमत्वातील श्रेष्ठतम व तितकाच गुह्य भाग दाखवायचा झालाच तर तो म्हणजे त्यांचे महायोगीत्व होय. आयुष्याच्या एका महन्मंगलक्षणी पंडीत श्री ईश्वरशास्त्रींची भेट चौलनिवासी महायोगीराज श्री चिंतामण महाराज गणेश प्रथम यांच्याशी झाली. त्यांचा अधिकार ओळखून श्री चिंतामण महाराजांनी अत्यंत प्रसन्न मनाने श्री ईश्वरशास्त्रींना श्रीविद्यामहायोगसाधनेमध्ये दीक्षित केले. मंत्रयोग, राजयोग, लययोग आणि हटयोग या श्री विद्यामहायोगाच्या प्रमुख अंगे असलेल्या चारही योगप्रकारांमध्ये परिपूर्ण पारंगत बनविले. श्री गुरुदेव चिंतामण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली महायोग साधना पूर्ण करून शके १८६२ विक्रमनाम संवत्सर पौष शुद्ध चतुर्थीला बुधवारी भगवान श्री चिदंबरमहास्वामी महाराजांच्या अवतार समाप्ती दिवशी पंडित ईश्वरशास्त्री महोदयांनी श्रीविद्यामहायोग क्रमातील पूर्णता गाठून श्रीगुरुदेवांच्या कृपेने महायोगीपद प्राप्त करून घेतले. महायोगी ईश्वरशास्त्रींचा जन्म १९१० साली झाला. त्यांना ७८ वर्षाचे सुदीर्घ जीवन लाभले. वेद-आगमोक्त विहित कर्म, श्रौताग्निची निरंतर सेवा, व्याकरणादि आर्षशास्त्रांचे निरंतर अध्ययन व अध्यापन करित करितच गुरुपदिष्ठ मार्गाने श्रीविद्यामहायोगाची साधना आजीवन करित श्रीविद्यास्वरूपच झालेल्या पंडीतवरेण्य पूज्यपाद श्री ईश्वरशास्त्री दीक्षित महाराजांनी एक आदर्श गृहस्थाश्रमी योगी संसारी आयुष्यातील विविध प्रकारांच्या उत्तरदायित्वांचे भार सहन करूनही शांत प्रसन्न स्थितीमध्ये राहून ब्रह्मस्वरूपिणी पारमेश्वरी भगवती श्रीविद्येशी परिपूर्ण सामरस्य कसे अनुभवितो याचा एक आदर्श वास्तुपाठ संसारी साधकांपुढे ठेवला. पूज्यपाद गुरुवर्य महायोगी श्री ईश्वरशास्त्री दीक्षितांनी शके १९१० विभवनाम संवस्तरी मार्गशीर्ष द्वितीयेला रविवारी सकाळी ६.३० वाजता संकल्पपूर्वक देहविसर्जन करून सच्चिदानंदस्वरूपिणी चित्शक्तीशी विदेह सामरस्य प्राप्त करून घेतले. ११ डिसेंबर १९८८ रोजी त्यांनी आपली पृथ्वीवरील जीवनयात्रा समाप्त केली. भगवान श्री आदिगुरु दक्षिणामूर्तीपासून अतिप्राचीन कल्पातील कोण्या एका सत्ययुगामध्ये उगम पावलेली ही श्रीविद्यामहायोग साधनेची गंगा विद्यमान ऐतिहासिक युगातील विसाव्या शतकात होवून गेलेल्या पूज्यपाद महायोगीवरेण्य ईश्वरशास्त्री दीक्षित सद्गुरू देवांपर्यंत कशी अखंडित प्रवाहीत झाली याची थोडी फार तरी कल्पना वाचकांना वर दिलेल्या ऐतिहासिक क्रमाच्या वर्णनावरून लक्षात येण्यास हरकत नसावी. वरील सर्व विवेचनाचा सूक्ष्म बुद्धीपूर्वक विचार केल्यास असे दिसून येईल की, आदिगुरु दक्षिणामूर्तीपासून प्रवाहीत होत पूज्यपाद आदि शंकराचार्य आणि त्यांचे गृहस्थाश्रमी शिष्य पूज्यपाद विष्णूशर्मा यांच्यापर्यंत पोहचलेली आणि त्यांच्यापासून श्रीमत् भास्करराय भासुरानंदनाथ यांचेद्वारे पूज्यपाद महायोगीवरेंण्य ईश्वरशास्त्री दीक्षित सद्गुरूदेवापर्यंत पोहचलेली महायोग्यांची परंपरा ही मुख्यत्वेकरून गृहस्थाश्रमी योग्यांची आहे. या परंपरेतील सद्गुरुपदावर अभिषिक्त झालेले बहुसंख्य महायोगी पुरुष गृहस्थाश्रमी होते.

महायोगी श्री श्रीनिवास सिद्धाचार्य
महायोगी श्री श्रीनिवास सिद्धाचार्य
श्रीसद्गुरुदेवांनी त्यांना अशेषसाधनाधिकार देवून ‘सिद्धाचार्य’ या उपदेष्ट्या सद्गुरूंच्या सर्वश्रेष्ठ भूमिकेमध्ये प्रतिष्ठीत केले व त्यांना सर्व प्रकारच्या जिज्ञासू मुमुक्षूंना त्यांच्या त्यांच्या अधिकारानुरूप साधानोपदेश करण्याचा अधिकार प्रदान केला. याप्रमाणे पूज्यपाद जगद्रुवर्य श्रीमत् चंद्रशेखरेंद्रसरस्वती आणि पूज्यपाद सद्गुरुदेव श्रीमत् ईश्वरशास्त्री दीक्षित या दोन्ही महायोगीवरेण्यांच्या कृपेने श्रीविद्यामहायोगसाधनेमध्ये पूर्णतासिद्धीचा लाभ झाल्यानंतर सुद्धा श्री गुरुदेव श्रीनिवासजी आपल्या या दोन्ही सद्गुरुदेवांच्या सहवासात यथासंभव वारंवार राहू लागले आणि त्यांच्या अनुग्रह दृष्टीच्या प्रकाशात पूर्णतासिद्धीच्या लाभानंतरही साधकभावाचा अवलंब करून साधना करितच राहिले. दि. ११ डिसेंबर १९८८ रोजी पूज्य श्री सद्गुरुदेव ईश्वरशास्त्री समाधिस्थ झाल्यानंतर व दि. ८ जानेवारी १९९४ रोजी पूज्यपाद जगद्गुरुवर्य श्रीमत् चंद्रशेखरेंद्रसरस्वतीस्वामीमहाराज ब्रह्मीभूत झाल्यानंतर आपल्या दोन्हीही गुरुदेवांच्या दिव्य आदेशानुसार इच्छुक, सश्रद्ध, आस्तिक जनांना त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार दीक्षेद्वारे श्रीविद्यामहायोगसाधनप्रक्रियेमध्ये दीक्षित करण्याचा उपक्रम श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी आरंभिला व हे देवकार्य ते आजही निरलसपणे करित आहेत. वरील सर्व ऐतिहासीक कथनामधून वाचकांच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की, श्रीमत् आदिशंकर भगवत्पादांनी प्रवर्तित केलेल्या संन्यासी आणि गृहस्थ अशा दोन्ही प्रकारच्या गुरुशिष्यपरंपरेतून प्रकट झालेल्या महायोगी सद्गुरूंचा कृपाप्रसाद श्री गुरुदेव श्रीनिवासजींना लाभलेला होता. भगवान श्री परमाचार्य चंद्रशेखरेंद्रसरस्वती हे विद्यमान ऐतिहासीक काळातील अगदी अलीकडे होऊन गेलेले श्रीविद्यामहायोगी होते की जे आदिशंकर भगवत्पादांनी प्रवर्तित केलेल्या संन्यासी महायोग परंपरेतील श्रेष्ठतम आचार्य होते तर पूज्यपाद सद्गुरुदेव श्रीमत् ईश्वरशास्त्री दीक्षित हे श्रीमत् आदिशंकरभगवत्पादांनीच प्रवर्तित केलेल्या गृहस्थाश्रमी महायोगी गुरुशिष्य परंपरेतील विद्यमान आधुनिक काळातील अगदी अलीकडेच होऊन गेलेले एक अत्यंत श्रेष्ठ महायोगी आचार्य होते. या प्रकारे संन्यास आणि गृहस्थ अशा श्रीविद्यामहायोग्यांच्या दोन्ही परंपरातून कृपाप्रसाद लाभून पूर्णतासिद्धीचा लाभ करून घेणारे श्री गुरुदेव श्रीनिवासजी हे आधुनिक काळातील एकमेव उदाहरण म्हणावे लागेल. असो! या ऐतिहासीक परिचयाच्या निमित्ताने श्री गुरुदेव श्रीनिवासजींच्या व्यावहारिक जीवनाचा परिचय देणे अप्रस्तुत होणार नाही. श्री गुरुदेव श्रीनिवासजींच्या जन्माचे स्थल व काल या विषयीचे उल्लेख आधीच केलेले आहेत. आपला शालेय, महाविद्यालयीन व विश्वविद्यालयीन अभ्यास पूर्ण करून श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी व्यावसायिक जीवनाच्या प्रारंभी पहिली दोन वर्षे मुंबईजवळील पालघरमधील स्थानिक महाविद्यालयात व त्यानंतर त्यांच्या जन्मगावी सोलापूरमध्ये असलेल्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्य केले. आपले महाविद्यालयीन प्राध्यापकाचे ३४ वर्षाचे प्रदीर्घ असे व्यावसायिक जीवन पूर्ण करून त्यांनी सप्टेंबर २००६ मध्ये व्यावसायिक निवृत्ती स्वीकारली. निवृत्ती नंतरही त्यांचा विविध धार्मिक, तात्विक व अध्यात्मिक विषयांचा व्यासंग चालूच आहे. आजही ते इच्छुक जिज्ञासू साधकांना श्रीविद्यामहायोगासहित सर्वच अध्यात्मिक विषयांचे मार्गदर्शन श्री गुरुदेवांच्या आदेशानुसार करितच आहेत. श्री गुरुदेवांना दोन मुले असून मुलगा चि. अनिरुद्ध आणि मुलगी सौ. गायत्री दोघेही विवाहीत असून आपापल्या व्यावसायिक व सांसारिक जीवनामध्ये सुखी व सुस्थिर आहेत. श्री गुरुदेवांच्या व्यावहारिक व पारमार्थिक जीवनामध्ये त्यांच्या पत्नी सौ. सुलक्षणादेवी यांचा महत्त्वाचा कार्यभाग आहे. किंबहुना, पत्नी सौ. सुलक्षणादेवी हिच्याकडून मिळत गेलेल्या सर्वांगीण सहकार्य आणि समरसतायुक्त उत्तेजानामुळेच आपल्या व्यावहारिक जीवनामधून यशस्वी वाटचाल आणि पारमार्थिक जीवनातून पूर्णतासिद्धी या दोन्ही इष्ट लाभांना गाठू शकलो, याचा श्री गुरुदेव श्रीनिवासजी अत्यंत कृतज्ञतेने उल्लेख करतात. पुज्य गुरुमाता सौ. सुलक्षणादेवी श्रीनिवासजी काटकर यांचे दि. ८ सप्टेंबर २००८ रोजी निधन होवून त्या श्रीविद्यामातृचरणी लीन झाल्या. आपल्या संसारी व पारमार्थिक जीवनाला दिव्य सामर्थ्याच्या आधारावर बळकटपणे घडविण्यास कारणीभूत झालेली आपली दिव्यशक्ती म्हणून श्रीगुरुदेव श्रीनिवासजी आणि त्यांचे असंख्य अनुग्रहित शिष्य कै. सौ. गुरुमाता सुलक्षणादेवी यांचे विनम्र भक्तीने स्मरण करतात. आदिगुरु भगवान श्री दक्षिणामूर्तींपासून प्रवाहीत झालेली ही श्रीविद्यामहायोगस्वरूपिणी गंगा भगवान श्री दत्तात्रेय, परशुराम, दुर्वास, अगस्त्य, हयग्रीव, सुमेधा हारितायन यांसारख्या दिव्य आणि सिद्ध महर्षिच्या द्वारे प्रवाहित होत होत भगवान श्री आदिशंकरभगवद्पादांपर्यंत कशी पोहोचली आणि तेथून पुढे शंकरपद्मपादादि संन्यस्त महायोगी आणि विष्णूशर्मालक्ष्मणादि गृहस्थ अशा विविध गुरुपरंपरामधून प्रवाहित होत होत महायोगीराज भास्कररायभारती, स्वयंप्रकाशयती, मार्तंड दीक्षित, श्री चिदंबरेश्वर दीक्षित यांसारख्या अवतारी सिद्ध महापुरुषांच्या तपस्येमधून उत्तरोत्तर अधिकच प्रवाहित होत होत आधुनिक काळामध्ये पूज्यपाद भगवान श्रीमत् चंद्रशेखरेंद्रसरस्वती आणि पूज्यपाद महायोगीवरेंण्य श्रीमत् ईश्वरशास्त्री दीक्षित या दोन महायोगी वरेण्यांच्या अनुग्रहपूर्ण प्रसादामधून श्रीविद्यामहायोगपरंपरेतील विद्यमान सिद्धाचार्य पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांच्या जीवनामध्ये कशी अवतीर्ण झाली याचे दिग्दर्शन करणारा हा ऐतिहासिक आढावा जिज्ञासू वाचकांना संतोष देवो, अशी अपेक्षा करून श्रीविद्यामहायोगाचा सैद्धांतिक आणि ऐतिहासिक परिचय करून देणाऱ्या या लेखणीला येथे विश्राम देतो.
गुरु-शिष्य परंपरा
भगवान परमशिव श्री दक्षिणामूर्तीपासून ते श्रीविद्याखंडमहायोगी महायोगी श्रीनिवास सिद्धाचार्य यांच्या वर्तमान गुरुपर्यंत चालत आलेली “गुरु-शिष्य” परंपरा पुढील चित्रात स्पष्ट केली आहे.

श्री विद्यामहायोग संप्रदायांतर्गत पाच विश्व महागुरू
श्रीविद्यामहायोगसंप्रदायामध्ये भगवान श्री परमशिव आनंदभैरव नटराज, भगवान श्री महाविष्णू हयग्रीव, भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्ती, भगवान श्रीअवधूत दत्तात्रेय आणि भगवान श्रीभार्गव जामदग्न्य परशुराम या पाच महायोगी वरेंण्यांचे विश्वमहागुरु म्हणून अनन्यसाधारण असे सर्वोच्च महत्वाचे स्थान आहे. या पाच विश्वमहागुरुंचे या संप्रदायातील अनन्यसाधारण सर्वश्रेष्ठ स्थान हे श्रीविद्यामहायोग संप्रदायाच्या अनेक अनेक ठळक वैशिष्ठ्यांपैकी एक महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणता येईल. श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांचेकडून श्रीविद्यामहायोगसाधनेमध्ये दीक्षित झालेल्या प्रत्येक साधकाला या पाचही विश्वमहागुरुंची भक्तीपूर्वक उपासना करून त्यांची कृपा संपादन केल्यानंतरच आपल्या गुरुपदिष्ट साधनाक्रमामधून निर्विघ्नपणे वाटचाल करीत करीत परमार्थतत्वाच्या परिपूर्ण साक्षात्काराचे ध्येय गाठण्यामध्ये यशस्वी होता येते.
उत्तरेत हिमालयात बदरीनारायणक्षेत्र, पूर्वेकडील जगन्नाथपुरी, दक्षिण भारतातील शृंगेरी आणि भारताच्या पश्चिम भागात गुजरातमधील द्वारकाक्षेत्री मठ स्थापना करून व त्यावर आपल्या प्रमुख चार शिष्यांना अधिष्ठित करून त्यांच्या शिष्योपशिष्याद्वारे सनातन धर्माच्या प्रचाराचे कार्य कालप्रवाहात अव्याहतपणे चालू रहावे अशी व्यवस्था आचार्य शंकरांनी केली. स्वत: आचार्य शंकरांनी चोल देशातील अर्थात विद्यमान तामिळनाडूमधील सप्तमोक्षपुरींपैकी एक मोक्षपुरी म्हणून विख्यात असलेल्या आणि भगवती श्रीलालितामहात्रिपुरसुंदरी, श्रीविद्याकामाक्षी देवीचे जागृत शक्तीपीठ असलेल्या कांचीपुरम् अथवा कांचीवरम् येथे मठ स्थापना करून त्या मठावर स्वत: आचार्य शंकरच पीठाधिपती म्हणून अधिष्ठित झाले. त्यांनी स्थापन केलेला हा मठच त्यांच्यापासून अविरतपणे गुरुशिष्य परंपरेने पीठाध्यक्षांच्या आसनावर अधिष्ठित झालेल्या अनेक विद्वान, तपस्वी, संन्यस्त जीवन जगणाऱ्या महायोगी पुरुषांनी स्वत:च्या अध्यात्मिक कर्तृत्वाने ‘कांचीकामकोटीपीठ’ म्हणून नावरुपाला आणला. आचार्य शंकरानी उभारलेल्या या मठसंस्थांद्वारे आजही सनातन वैदिक धर्माच्या प्रचार-प्रसाराचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. भगवान श्रीशंकराचार्यांनी अडीच हजार वर्षापूर्वी अवतार धारण करून सनातन वैदिक धर्माचे उद्धार करण्याचे लोकोत्तर कार्य केले. त्याचे साधारणपणे तीन पैलू दिसून येतात. “वेदोनित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयताम् |” हा संदेश देवून वेदाध्ययन आणि वेदमूलक कर्माचे आचरण याकडे समस्त सनातनधर्मीयांचे लक्ष वळविणे हा त्यांच्या सनातन धर्मोद्धाराचा महत्त्वाचा पैलू होता. परंतु त्याचबरोबर वेदाचे अंतीम तात्पर्य वर्णविहित कर्मच आजीवन करण्यामध्ये नसून कर्तुभोक्तृभावहीन परब्रम्हाशी ऐक्य अनुभवून नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होणे यातच जीवाची कृत्यकृत्यता आहे. याचे प्रतिपादन करण्यामध्येच समस्त वेदावेदांताचे अंतीम तात्पर्य आहे, असा सिद्धांत मांडून केवळ बाह्याचाररत असलेल्या वैदिक समाजामध्ये त्यांनी अव्दैतज्ञानमार्गाची जी प्रतिष्ठा केली तो त्यांचा अवतारी धर्मकार्याचा दुसरा पैलू होता. परंतु त्याचबरोबर आपण हे ही आवर्जुन लक्षात घेतले पाहिजे की, त्यांनी केलेल्या धर्मकार्याचा तितकाच महत्त्वाचा असलेला एक तिसरा पैलू सुध्दा होता की ज्याच्या अस्तित्वाची अजूनपर्यंत फारशी दखल घेतली गेलेली नाही. तो तिसरा पैलू म्हणजे त्यांनी केलेल्या श्रीविद्याअखंडमहायोग साधनप्रणालीचा पुनरुद्धार हा होय. श्रीमत् आचार्य शंकरानी केलेल्या धर्मकार्याच्या वरील तिसऱ्या पैलूचे महत्व आपण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट खरी की, श्रीमद्चार्यांनी ‘वेदोनित्यमधीयताम्’ असा आदेश वैदिकांना देवून वैदिकांना वेदाध्ययनाकडे व वेदमूलक कर्म करण्याकडे वळविले. त्यांच्या या कर्मामुळे जैन-बौद्धांच्या प्रभावाखाली सापडून समाजातील जो बुध्दीमान अभिजनवर्ग सनातन धर्माचे मूळ असलेल्या वेदांच्या अध्ययनाला विमुख झालेला होता तो पुन्हा श्रद्धेने वेदाध्ययनाकाडे आणि वैदिक पद्धतीला अनुसरून जगण्याकडे प्रवृत्त होवू लागला. परंतु मुळातच हा वर्ग संख्येने मर्यादित होता. कारण वैदिक परंपरेला अनुसरून वेदाध्ययन करण्यासाठी आणि वेदमूलक वर्णविहीत कर्म करण्याचा अधिकार ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णातील उपनयन संस्कार झालेल्या पुरुषांनाच होता. वरील तिन्ही वर्णातील स्त्रिया आणि चौथ्या वर्णातील सर्व शूद्र स्त्री-पुरुष हे वेदाध्ययन व वेदमूलक कर्माचे आचरण या दोन्ही गोष्टी करू शकत नव्हते. उपनिषद् अथवा वेदांताचे अध्ययन फक्त अव्दैतज्ञानेच्छुक व मोक्षार्थी असलेल्या संन्याश्यांपुरतेच मर्यादित होते. याचा अर्थ असा की, वेद आणि वेदांत या दोन्हीवर आधारलेल्या साधनापद्धती सनातनधर्मीय समाजातील पहिल्या तीनही वर्णातील गृहस्थाश्रमी पुरुष व त्यांच्यामधूनच विहित कर्म त्याग करून पुढे आलेल्या व संन्यस्त जीवन जगणाऱ्या ‘यती’ वर्गापुरताच मर्यादित होत्या. या सर्व साधनापद्धतींमध्ये ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णातील स्त्रिया व शूद्रवर्णातील स्त्री पुरुषांना प्रवेश नव्हता. यामुळे समाजातील एक बहुसंख्य वर्ग वेदमूलक साधनांचे साक्षात अनुसरण करू शकत नव्हता. अशा काळात भगवत् आद्य शंकराचार्यांनी श्रीविद्याअखंडमहायोगासारखी वेदमूलक असलेली आणि स्मृती, पुराणे व तंत्रागम यांच्यामधून परिपुष्ट झालेली एक श्रेष्ठतम साधना सर्व वर्ण व आश्रमातील स्त्री-पुरुषांना त्या साधनेचा अधिकार देवून उपलब्ध करून दिली. हा श्रीमत् आद्यशंकरचार्यांच्या सनातन धर्मोद्धाराचा एक अत्यंत महत्वाचा पैलू होता की ज्याच्याकडे सनातन धर्माच्या इतिहासाच्या अभ्यासंकाचे व खुद्द सनातन धर्मियांचे फारसे लक्ष गेलेले नाही. भगवान श्री आदिशंकराचार्य सर्व वर्ण आश्रमातील स्त्री-पुरुषांना श्रीविद्यामहायोगात प्रवेश देऊन थांबले नाहीत तर त्यांनी काळातील आसेतुहिमाचलात पसरलेल्या व सिंधूसौविरादि कामरूप असम पर्यंत विस्तारलेल्या संपूर्ण भारतवर्षातील तत्कालीन समाजामध्ये ही साधनपद्धती श्रद्धेने अनुसरली जावी या हेतूने श्रीविद्याअखंडमहायोगाचा उपदेश करणाऱ्या धर्मपीठांची व त्या पीठांद्वारे उपदेशाचे कार्य करणाऱ्या उपदेशक अचार्यागुरुंची एक सक्षम यंत्रणाच उभी केली. श्रीमत् आद्यशंकरभगवत्पादांनी उभ्या केलेल्या या सर्व कार्याचा विस्तृत वृतांत श्रीमत् आद्यशंकराचार्यांच्या शिष्यपरंपरेमध्ये होवून गेलेल्या श्रीमत्विद्यारण्ययती यांनी रचलेल्या ‘श्रीविद्यार्णवतंत्र’ या ग्रंथामध्ये दिलेला आहे. ‘श्रीविद्यार्णवतंत्र’ हा श्रीविद्यामहायोग साधनपध्दतीचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक स्वरूप स्पष्ट करणारा एक अत्यंत प्रौढ व विद्वद्मान्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखक श्री विद्यारण्ययती हे होत. आधुनिक ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या इतिहास तज्ञांनी केलेल्या अनुमानानुसार हे विद्यारण्ययती इसवी सणाच्या अकराव्या शतकात होवून गेले असावेत. त्यांनी रचलेत्या ‘श्रीविद्यार्णवतंत्र’ मध्येच त्यांच्या काळात कान्यकुब्ज प्रदेशात म्हणजेच सध्याच्या उत्तरप्रदेशातील कनौज नगरच्या परिसरात प्रचलित असलेल्या कनौजी हिंदी भाषेतील कांही शब्दांचा उल्लेख येतो. उदाहरणार्थ, लाकूड जाळून शांत झाल्यानंतर त्याचे जे काळे कोळसे तयार होतात त्याला कान्यकुब्ज भाषेत ‘कोयला’ म्हणतात. असा उल्लेख श्री विद्यारण्ययतीच्या श्रीविद्यार्णवतंत्राध्ये एके ठिकाणी येतो. यावरून हे यती उत्तर भारतातील सध्याच्या उत्तरप्रदेशातील असावेत असे अनुमान करता येते.
श्रीविद्यामहायोगसंप्रदायामध्ये प्रवीष्ट होऊन साधना करणाऱ्या साधकांमध्ये ही एक बऱ्यापैकी सर्वज्ञात वस्तुस्थिती आहे की, श्रीविद्यामहायोगसंप्रदायामध्ये साधानोपदेश करणाऱ्या एकंदर बारा प्रमुख अशा सर्वश्रेष्ठ उपदेष्ट्या आचार्यांची नोंद करण्यात आलेली आहे. त्या बारा सर्वश्रेष्ठ अशा आचार्यांच्या नावांचा उल्लेख करणारा एक संस्कृत श्लोकही श्रीविद्यामहायोग संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहे तो असा :-
मनुश्चंद्रकुबेरश्च लोपामुद्रा च मन्मथ: | अगस्तिरग्नी: सूर्यश्च विष्णु: स्कंदश्शिवस्तथा | क्रोधभट्टारकश्चापि द्वादशैतेति देशिका: || १ ||
१. वैवस्वत मनु, २. चंद्र, ३. कुबेर , ४. लोपामुद्रा , ५. मन्मथ अथवा कामदेव , ६. अगस्ती, ७. अग्नि , ८. सूर्य , ९. विष्णु , १०. स्कंद , ११. शिव , १२. क्रोधभट्टारक अथवा दुर्वास हे ते बारा सर्वश्रेष्ठ आचार्य होत की ज्यांनी अतिप्राचीन अशा वेगवेगळ्या कल्पामधून आणि युगामधून देव, सिद्ध आणि मानव अशा तीनही वर्गातील साधकांमधून श्रीविद्यामहायोगाची साधन परंपरा दीक्षानुग्रहाद्वारे जिवंत ठेवली. जेव्हा जेव्हा श्रीविद्यामहायोग परंपरा कालौघामध्ये क्षीण होत असे तेव्हा तेव्हा या बारा आचार्यांपैकी कोणी ना कोणी अवतरून आपल्या व्यक्तिगत तपस्येद्वारे आणि अधिकारी शिष्यांना उपदेश करण्याच्या प्रक्रियेद्वारे श्रीविद्यामहायोग साधनक्रम पुनर्जीवित करीत असे. या बाराही आचार्यांनी श्रीविद्यामहायोगसंप्रदायाच्या अंतर्गतच आपापल्या नावांने महायोग साधनेचे स्वतंत्र संप्रदाय प्रस्थापित केले व ते संप्रदाय अविछिन्न अशा गुरुशिष्यपरंपरेमधून अखंड वृद्धिंगत होत राहिले. या बारा आचार्यांची नांवे पाहिल्यास त्यातील कित्येक आचार्य सनातन हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ उपास्य देवता म्हणून प्रतिष्ठित पावलेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. वैवस्वत मनु, महर्षि अगस्ती आणि त्यांची पत्नी भगवती श्रीलोपामुद्रा आणि महर्षि क्रोधभट्टारक दुर्वास या तीन मानव कोटीमधील मुनिवर्यांना वगळले तर वरील बारा आचार्यांच्या यादीमधील उरलेले सर्व आचार्य हे सनातन हिंदू उपासना संप्रदायामध्ये पूजनीय म्हणून प्रतिष्ठा पावलेल्या देवता होत हे आपल्या लक्षात येईल.
या बाराही आचार्यांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जरी हे बारा आचार्य आपापल्या व्यक्तिगत संप्रदायापुरते श्रीविद्यामहायोगाच्या काही विशेष साधनक्रमाचे स्वतंत्र प्रवर्तक असले तरी त्या आचार्यांचा साधनानुग्रह व साधानोपदेश करण्याच्या कार्यामध्ये भगवान श्री महाविष्णू आणि भगवान श्री परमशिव या दोन मुख्य आचार्यांशीच घनिष्ट संबंध होता. वरील बारा आचार्यांपैकी भगवान श्री विष्णू व भगवान श्री शिव सोडल्यास बाकी उरलेले दहाही आचार्य वरील दोन देवता कोटीतील आचार्यांपैकी कोणातरी एकाबरोबर शिष्य या नात्याने संबंधीत होते असे दिसून येईल.
भगवान श्री हयग्रीव महर्षी
भगवान परमशिव श्री आनंदभैरव नटराज
भगवान परमशिव दक्षिणामूर्ती
भगवान श्री हयग्रीव महर्षी, भगवान परमशिव श्री आनंदभैरव नटराज आणि भगवान परमशिव दक्षिणामूर्ती
श्रीविद्यामहायोग परंपरेशी संबंधीत असलेल्या आणि केवळ त्या परंपरेतील सद्गुरूंच्या मुखातून अवगत होणाऱ्या कांही गुढ, रहस्यमय सत्यांपैकी एक सत्य किंवा वस्तुस्थिती अशी आहे की, अतिप्राचीन काळात म्हणजे विद्यमान श्वेतवाराह कल्पाच्याही आधी होवून गेलेल्या सारस्वत कल्पामध्ये भगवान श्री महाविष्णूंनी हयग्रीव ऋषींचा अवतार घेतला. आणि त्या अवतारामध्ये अधिकारी देवता व ऋषींमध्ये श्रीविद्यामहायोगाचा उपदेशाद्वारे प्रचार – प्रसार केला. अशाच एका अतिप्राचीन कल्पामध्ये भगवान परमशिवांनीसुद्धा सध्या तमिळनाडूमध्ये असलेल्या आकाशचिदंबरम् या पुण्यक्षेत्री श्री आनंदभैरव नटराज अथवा नटेश्वर या रूपाने अवतार धारण केला आणि अधिकारी देवता व ऋषींना श्रीविद्यामहायोगाचा उपदेश केला. श्रीविद्यामहायोगाच्या बारा आचार्यांच्या नावांची नोंद करणाऱ्या वरील श्लोकातील भगवान श्रीविष्णू व भगवान श्री शिव ही नांवे वर उल्लेखिलेल्या भगवान महर्षि हयग्रीव आणि भगवान महर्षि आनंदभैरव नटराज या अनुक्रमे भगवान श्री विष्णू व शिव या दोघांच्या अवतारांचे निर्देश करतात.
वर म्हटल्याप्रमाणे भगवान श्रीमहाविष्णू हयग्रीव व भगवान परमशिव श्री आनंदभैरव नटराज या दोन प्रमुख आचार्यांपैकी कोणातरी एकाबरोबर वर उल्लेखिलेल्या श्लोकातील उरलेले दहा आचार्य शिष्य या नात्याने संबंधीत होते. उदाहरणार्थ महर्षि अगस्ती व त्यांची पत्नी लोपामुद्रा यांचा शिष्यत्वाच्या नात्याने भगवान श्री महाविष्णू हयग्रीव ऋषींशी संबंध होता तर मन्मथ अथवा कामदेव, स्कंद अथवा षडानन कार्तिकेय, कुबेर या आचार्यांचा शिष्यत्वाने संबंध भगवान परमशिव श्री आनंदभैरव नटराज यांच्याशी होता. निष्कर्ष असा की, श्रीविद्यामहायोग साधनेचे प्रवर्तक वेगवेगळ्या कल्पांमधून, महायुगांमधून व युगांमधून जरी मनु, चंद्र इत्यादी बारा आचार्यांकडून झालेले होते तरी त्या सर्वांमध्ये श्रेष्ठतम व प्रमुख असे दोनच आचार्य होत. ते म्हणजे भगवान महर्षि हयग्रीव श्रीमहाविष्णू आणि भगवान महर्षि श्री आनंदभैरव नटेश्वर शिव हे होत.
त्यानंतर विद्यमान श्वेतवाराह कल्पाच्या अंतर्गत असलेल्या सातव्या वैवस्वत मन्वंतरातील पहिल्या महायुगातील कृतयुगाच्या प्रारंभी भगवान श्री परमशिवांचा हिमालयातील महाकैलास क्षेत्री आणखी एक सर्वश्रेष्ठ अवतार झाला व तो म्हणजे भगवान परमशिव दक्षिणामूर्ती हा होय. भगवान परमशिव दक्षिणामूर्तींनी त्यांच्याही आधी होवून गेलेल्या भगवान श्री आनंदभैरव नटराज आणि भगवान श्री हयग्रीव महर्षी यांनी प्रवर्तित केलेल्या श्रीविद्यामहायोग साधन परंपरेला एक नवीन उजाळा दिला. वरील दोनही आचार्यांच्या परंपरामध्ये प्रचलित असलेले श्रीविद्यामहायोग साधनेतील कालोचित घटक स्वीकारून आणि त्यांना स्वतःच्या तपस्या व दिव्य प्रतिभेतून प्रकट झालेल्या साधनक्रमांची जोड देवून श्रीविद्यामहायोग साधनक्रमाची एक परिशुद्ध आवृत्ती भूतलावर प्रकट केली. स्वतः भगवान दक्षिणामूर्तींनी ‘दक्षिणामूर्तीसंहिता’ हा ग्रंथ रचून श्रीविद्यामहायोग साधनेचा परिशुद्ध क्रम हिमालायस्थ देवता आणि ऋषींमध्ये प्रकट केला. श्रीमान् महर्षि अत्रि आणि त्यांची महासाध्वी पत्नी भगवती अनसूया यांचे पुत्र असलेले व श्री ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही देवतांच्या महाशक्तींचा पूर्ण अवतार असलेले भगवान श्री दत्तात्रेय यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारून भगवान परमशिव दक्षिणामूर्तींनी श्रीविद्यामहायोगसाधनेचे समग्र रहस्य भगवान श्री दत्तात्रेयांना सांगितले.

भगवान श्री दत्तात्रेय
भगवान श्री दत्तात्रेय
दक्षिणामूर्तींनी श्रीविद्यामहायोगसाधनेचे समग्र रहस्य भगवान श्री दत्तात्रेयांना सांगितले. श्री दत्तात्रेयांनी आदिगुरु परमशिव दक्षिणामूर्तींनी उपदिष्ट केलेल्या साधनक्रमाला अनुसरून श्रीविद्यामहायोगसाधना केली आणि आपल्या पूज्य गुरुदेवांकडून प्राप्त झालेले श्रीविद्यामहायोगशास्त्र आणि स्वतःच्या व्यक्तिगत साधन तपस्येमधून प्राप्त झालेली दिव्य पारमार्थिक अनुभूती या दोन्हींच्या आधारे श्रीविद्यामहायोग साधनेचे विवेचन करणारा ‘दत्तसंहिता’ हा अठरा हजार श्लोक असलेला स्वतंत्र ग्रंथ लिहिला. भगवान श्री महाविष्णूंचे सहावे अवतार असलेल्या भगवान श्री भार्गव जामदग्न्य परशुराम या भगवान श्री दत्तात्रेयांच्या शिष्योत्तमांनी दीक्षानुग्रहपूर्वक आपले पूज्य श्रीगुरुदेव दत्तमहाराजांच्या चरणी बसून त्यांनी लिहिलेल्या ‘दत्तसंहिता’ या बृहत्ग्रंथाचे अध्ययन केले. त्या ग्रंथाची विशालता आणि त्या ग्रंथात प्रतिपाद्य असलेल्या श्रीविद्यासाधनेशी संबंधित असलेल्या तत्वांची गहनता पाहून बुद्धीदुर्बल ब साधनदुर्बल सर्वसामान्य व्यक्तींना ‘दत्तसंहिता’ हा ग्रंथ दुर्बोध होईल असे लक्षात आल्यानंतर संपूर्ण ‘दत्तसंहिता’ ग्रंथामधील सर्वच विषय सुलभ व सारग्राही भाषेत संग्रहित करून ते सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या साधकांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने भगवान श्री परशुरामांनी सहा हजार सूत्रे असलेला व पन्नास खंडांमध्ये विभागला गेलेला ‘परशुरामकल्पसूत्र’ हा ग्रंथ लिहिला. परंतु बुद्धिगत दोषांमध्ये झालेली वाढ आणि साधानाधिकार संपत्तीचा उत्तरोत्तर होत जाणारा ऱ्हास यामुळे भगवान श्री परशुरामांनी रचलेला ‘कल्पसूत्र’ हा ग्रंथही दुर्बोध वाटू लागला. भगवान श्री भार्गव परशुराम यांचे शिष्योत्तम श्रीमन् महर्षि सुमेधा हारितायन यांनी ‘दत्तसंहिता’ आणि ‘परशुरामकल्पसूत्र’ या दोन्ही ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील सार सांगणारा दहा खंडात्मक ग्रंथ लिहिला. हा दहा खंडात्मक ग्रंथही ‘परशुरामकल्पसूत्र’ म्हणून ओळखला जातो. कारण मूळ पन्नास खंडात्मक परशुरामकल्पसूत्रातील सर्वच विषय सुमेधा हारितायनांनी रचलेल्या दहा खंडात्मक कल्पसूत्र ग्रंथामध्ये संक्षेपाने आलेले आहेत. श्रीमन् महर्षि सुमेधा हारितायन यांचे आणखी एक महत्वाचे वाङमयीन कार्य म्हणजे त्यांनी केलेली ‘त्रिपुरारहस्य’ या ग्रंथाची रचना होय.

भगवान श्री परशुराम
भगवान श्री परशुराम

भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज
भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज

भगवान श्री शिवचिदंबर महास्वामी
भगवान श्री शिवचिदंबर महास्वामी

याच कारणासाठी श्री गुरुदेव श्रीनिवासजी त्यांच्याकडून श्रीविद्यामहायोगात दीक्षित झालेल्या साधकांना भगवान आदिगुरु श्री दक्षिणामूर्ती, भगवान श्री दत्तात्रेय, भगवान श्री परशुराम, भगवान श्री हयग्रीव महाविष्णूस्वरूप श्री ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्री आनंदभैरव नटेश्वरस्वरूप श्री चिदंबर महास्वामी या पाच विश्वमहागुरुंची आराधना करण्याचा आदेश देतात. किंबहुना, श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी प्रकट केलेले हे एक महासत्य होय की, भगवान आदिगुरु दक्षिणामूर्तींपासून प्रकट झालेल्या आणि विद्यमान काळात पुज्यश्री गुरुदेव श्रीनिवासजी पर्यंत येवून पोहचलेल्या श्रीविद्यामहायोग परंपरेचे एक प्रधान वैशिष्ट आहे की, या परंपरेमध्ये वर उल्लेखिलेल्या पंचविश्वमहागुरुंचे स्थान असाधारण आहे. श्री गुरुदेवांचा आपल्या समग्र शिष्यांना असा स्पष्ट आदेश आहे की, प्रत्येक श्रीविद्यामहायोग साधकाकडून वर उल्लेखिलेल्या पाचही विश्वमहागुरुंची यथाशक्ती आराधना भक्तीश्रद्धापूर्वक निरंतर झाली पाहिजे. या पाचही विश्वमहागुरुंची कृपा संपादन केल्याखेरीज श्रीविद्यामहायोगाची साधना सफल होत नाही. भगवान श्री परमशिवांनी ‘शिवसूत्र’ मध्ये “श्रीगुरू: सर्वकारणभूता शक्ति:|” या सूत्रामधून म्हटल्याप्रमाणे विश्वमहागुरुस्वरूप भगवान श्री दक्षिणामूर्ती, भगवान श्री दत्तात्रेय, भगवान श्री परशुराम, भगवान श्री हयग्रीव महाविष्णूस्वरूप श्री ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्री आनंदभैरव नटेश्वरस्वरूप श्री चिदंबर महास्वामी या पाच विश्वमहागुरुंच्या विग्रहामधून अखंड क्रियाशील असलेली दिव्य गुरुशक्ती हीच साधकांना परिपूर्ण परमार्थ ज्ञानसिद्धी देण्यास पूर्ण समर्थ आहे. म्हणून श्रीविद्यामहायोग परंपरेत दीक्षित झालेल्या साधकांनी वरील पाचही विश्वमहागुरुंची उपासना आपल्या साधन संप्रदायाचे एक प्रधान दिव्य वैशिष्ट आहे याचे भान जागृत ठेवून करीत रहावी असा श्री गुरुदेव श्रीनिवासजींचा आदेश आहे.